नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाऊस आणि चिखलामुळे मैदाने, उद्यानांमध्ये योगा, प्राणायाम, हास्ययोगासह व्यायाम करण्यास अडचणी येत आहेत. व्यायामासाठी प्रभाग २४ मधील सभागृहे, समाजमंदिरे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना महापालिका आयुक्तांनी स्वअधिकार वापरून खुली करून द्यावीत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना २६ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे.
महापालिकेच्या समाजमंदिरांच्या दर आकारण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे शहरासह प्रभाग २४ मधील अनेक समाजमंदिरे, सभागृह कुलूपबंद अवस्थेत आहेत. तिडकेनगर, जगतापनगर, कर्मयोगीनगर, गोविंदनगर, खोडेनगर, जुने सिडको, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, कृष्णबन कॉलनी, काशिकोनगर आदी संपूर्ण प्रभाग २४ मधील महिला, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी गैरसोय झाली आहे. उद्याने, मैदाने, जॉगिंग ट्रॅकवर चिखलात त्यांना योगा, प्राणायाम करावा लागत आहे. हास्ययोगा क्लबच्या सदस्यांचीही मोठी गैरसोय झाली आहे. जास्त पाऊस आणि चिखलामुळे या व्यायामात खंड पडत आहे. आयुक्तांनी स्वअधिकारात प्रभाग २४ मधील सभागृह, समाजमंदिरे पावसाळ्याच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिक व महिलांना खुली करून द्यावीत, गैरसोय दूर करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी बुधवारी, २६ जुलै २०२३ रोजी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची स्वत: भेट घेवून निवेदन दिले. शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, भारती देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, टी. टी. सोनवणे, विनोद पोळ, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मगन तलवार, सुनीता उबाळे, उज्ज्वला सोनजे, मिनाक्षी पाटील, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींनी ही मागणी केली आहे.