नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोविंदनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगरसह प्रभाग २४ मधील गॅस पाईपलाईनमुळे उखडलेल्या रस्त्यांचे खडीकरण करा, चिखल हटवा, पाण्याचा निचरा करा आदी मागण्या करीत गोविंदनगरमध्ये शुक्रवारी भर पावसात रहिवाशी रस्त्यावर उतरले. महापालिका उपअभियंता हेमंत पठे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे.
प्रभाग २४ मध्ये गॅस पाईपलाईनमुळे उखडलेल्या काही रस्त्यांचे अद्यापही खडीकरण झालेले नाही. ठिकठिकाणी साचलेले पाणी व चिखल यामुळे दुचाकी घसरत आहेत. नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी खडीकरणाचे सुरू झालेले काम अचानक बंद करण्यात आले, अपूर्ण सोडण्यात आले. गोविंदनगरमध्ये शुक्रवारी सकाळी नऊ वाजता न्यू इरा हायस्कूलजवळ संतप्त नागरिकांनी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. समस्या सोडविण्यासाठी घोषणा दिल्या.
या आंदोलनात बाळासाहेब मिंधे, संगीता देशमुख, दिलीप जगताप, सुभाष कावेडे, शिवदास शिंदे, प्रदीप विसपुते, जयंत देशमुख, बाळासाहेब देशमुख, हेमंत पारीख, चंद्रशेखर आढाव, रमेश पाटील, अशोक देवरे, सुदाम निकम, अशोक पालवे, शिवाजीराव वर्पे, डॉ. शितल हिरण, रूपक मैंद, स्नेहलता सोनवणे, आरती जोशी, योगिता पारीख, सुनीता बागुल, मनिषा कुंभारे, स्मिनल शिंदे, सं. तु. पानसरे, सुनीता वर्पे, दिपा जगताप, संध्या संधान, मंगला पाटील, प्रतिभा देशमुख, हेमा मैंद, शोभा बागुल, शिवदास शिंदे, संजीव वानखेडे, जयेश वर्पे यांच्यासह गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व रहिवाशी सहभागी झाले होते. एक तासानंतर महापालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत पठे, शाखा अभियंता जगदीश रत्नपारखी हे या ठिकाणी हजर झाले. गोविंदनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क अशा संपूर्ण प्रभाग क्रमांक २४ मधील रस्त्यांचे खडीकरण करण्यात येईल व इतर समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. दखल घेतल्याबद्दल महापालिका अधिकार्यांचे आभार मानण्यात आले.