नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने जगतापनगर, कालिका पार्क भागात बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसह रहिवाशांनी पाण्यात उभे राहून निदर्शने केली. घोषणाबाजी करीत पावसाळी गटार टाकून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी केली. दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. महापालिका अधिकार्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये पहिल्याच पावसात गोविंदनगर, कालिका पार्क, जगतापनगर भागात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने तळे निर्माण झाले होते. कालिका पार्क-जगतापनगर रस्त्यावर मंगळवारपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना घरांमध्ये जाणे-येणे अवघड झाले होते. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी बुधवारी सकाळी साचलेल्या पाण्यात उभे राहून निदर्शने केली.
या पाण्याचा निचरा करा, पावसाळी गटारीला जोडणारी लाईन टाका, अशी मागणी करीत घोषणाबाजी केली. या आंदोलनात शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, डॉ. जयंतीभाई पटेल, संगीता देशमुख, धवल खैरनार, रेखा देशमुख, संगीता भावसार, घनश्याम पटेल, कैलास देशमुख, उमेश भावसार, गौरव रत्नाकर, जयश्री पटेल, कणकलता जोशी, पुनम पाटील, प्रिया खैरनार, शिल्पा वाणी, स्मरणिका चंद्रात्रे, अलका कासोदेकर आदींसह रहिवाशी सहभागी झाले होते. एक तासाच्या आंदोलनानंतर महापालिका बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जगदीश रत्नपारखी, सहाय्यक कनिष्ठ अभियंता हिरामण दातीर, विनीत बिडवाई आदींसह कर्मचारी या ठिकाणी आले. तातडीची उपाययोजना म्हणून मल:निस्सारणच्या चेंबरमध्ये पावसाचे पाणी सोडण्यात आले. बुजलेले एक पावसाळी चेंबर मोकळे करण्यात आले. पाणी साचणार्या ठिकाणी कॅचपीट टाकून ते पावसाळी गटारीला जोडण्याची उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन शाखा अभियंता रत्नपारखी यांनी दिले. दरम्यान, संपूर्ण प्रभागात उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे.