नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभाग २४ मधील गॅस पाईपलाईनमुळे उखडलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग देवून पाऊस सुरू होण्याच्या आत हे काम पूर्ण करावे. रस्त्यावरील खड्डेही बुजवावेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात होवून जीवितहानी झाल्यास किंवा कोणी गंभीर जखमी झाल्यास त्याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. याबाबतचे निवेदन शहर अभियंत्यांना सोमवारी, ५ जून रोजी देण्यात आले आहे.
गोविंदनगर, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, बडदेनगर, जुने सिडको, कृष्णबन कॉलनी, बेळे कॉलनी, कोशिकोनगर, बाजीरावनगर, जगतापनगर, तिडकेनगर यासह संपूर्ण प्रभाग २४ मध्ये मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी ते बुजवावेत. गॅस पाईपलाईनच्या कामामुळे उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती धिम्या गतीने सुरू आहे, या कामाला वेग द्यावा, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, वंदना पाटील, भारती देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, प्रकाश दुसाने, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, बापूराव पाटील, नीलेश ठाकूर, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, दीपक दुट्टे, राहुल काळे, शैलेश महाजन, मगन तलवार, पुरुषोत्तम शिरोडे, प्रथमेश पाटील, हरिष काळे, तेजस अमृतकर आदींसह रहिवाशांनी केली आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघात होवून जीवितहानी झाली किंवा गंभीर दुखापत झाली, तर त्या घटनेची जबाबदारी शहर अभियंत्यांनी स्वत: आणि त्यांच्या विभागातील संबंधितांनी स्वीकारावी. पावसाळ्यात जनतेला त्रास झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सिटी सेंटर मॉल सिग्नलवर लोखंडी जाळीचा ढापा टाका
गोविंदनगरहून सिटी सेंटर मॉलकडे जाताना सिग्नलवर पावसाळी गटारीचे चेंबर आहे. त्यावरील सिमेंटचे चेंबर हे एका महिन्यात तीनवेळा तुटले. तिथे पुन्हा-पुन्हा सिमेंटचा ढापा टाकला जातो. जास्त वाहतुकीने तो तुटतो. या ठिकाणी लोखंडी जाळीचा ढापा टाकून कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे शहर अभियंत्यांकडे करण्यात आली आहे.