नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उंटवाडीतील प्रभाग क्रमांक २४ मधील कालिका पार्क परिसरातील भूमिगत विद्युत पुरवठ्याची एक वर्षाची चाचणी यशस्वी झाली आहे. शनिवारी, ८ एप्रिल रोजी तेथील घरांवर लोंबकळणार्या विद्युततारा काढण्यात आल्या. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या तीन वर्षांच्या प्रयत्नांना यश आले असून, तेवीस वर्षे जुना प्रश्न मार्गी लागला आहे. रहिवाशांनी समाधान व्यक्त करीत आनंद साजरा केला.
कालिका पार्क येथील घरांवरून उच्च आणि अतिउच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाच्या तारा होत्या. यामुळे रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. घरांची दुरुस्ती आणि वाढीव बांधकाम करण्याला अडसर निर्माण होत होता. या तारा भूमिगत कराव्यात, अशी मागणी वीस वर्षांहून अधिक काळापासून सुरू होती. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने या तारा भूमिगत करण्यासाठी सन २०२१ पासून प्रयत्न सुरू करण्यात आले. महापालिका, वीज वितरण कंपनी यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर या कामाला मंजुरी मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. फेब्रुवारी आणि एप्रिल २०२२ या दोन टप्प्यात हे काम करण्यात आले. यानंतर तब्बल वर्षभर भूमिगत विद्युत पुरवठ्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. खात्री झाल्याने शनिवार, दि. ८ एप्रिल २०२३ रोजी कालिका पार्कमधील साईराम, शिवलीला आणि विमल या रो-हाऊसवरील तारा काढण्यात आल्या. काही पोलही काढण्यात आले.
शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या तीन वर्षांच्या प्रयत्नांना यश आले. रहिवाशांचा तेवीस वर्षांचा प्रश्न मार्गी लागला. समाधान व्यक्त करीत नागरिकांनी शनिवारी आनंद व्यक्त केला. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, वसंत पोळ, राजेंद्र गवळी, भास्कर चौधरी, राजेंद्र वाणी, मधुकर वाणी, सोमनाथ काळे, राजेंद्र कारभारी, रमेश वांगले, भाऊसाहेब गोसावी, दामोदर मनोरे, संगीता देशमुख, शीतल सुराणा, चंद्रकला ठाकरे, वृषाली ठाकरे, लता काळे, शीतल गवळी, कुसुम कारभारी, कांता पोळ, शीतल पवार, प्रतिभा पाटील, नर्मदा मनोरे, ललीता येवले, सुमन भामरे, वीज वितरणचे सहाय्यक उपअभियंता प्रदीप गवई, दीपक शिर्के, किशोर वाघ, कॉन्ट्रॅक्टर विष्णु भुरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, रहिवाशी हजर होते.