नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅस पाईप लाईनसाठी प्रभाग क्रमांक २४ मध्ये खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी खडीकरण, डांबरीकरण करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना याबाबत सोमवार, दि. २० मार्च २०२३ रोजी निवेदन देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक २४ मधील जगतापनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, प्रियंका पार्क परिसरात ठिकठिकाणी गॅस पाईप लाईनच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्त्याचा खोदलेला ठराविक भागच नव्हे तर संपूर्ण रस्त्याचीच दुरावस्था झाली आहे. सर्व रस्ते उखडले गेले आहेत. मोठमोठे खड्डे व नाल्या तयार झाल्या आहेत. मातीचे ढिग तसेच असून काही ठिकाणी फक्त माती पसरवून देण्यात आली आहे. यामुळे घरांमध्ये येणे-जाणे कठीण झाले आहे. दुचाकी व चारचाकी या मातीमध्ये फसत आहेत. पावसाळ्यापूर्वी ही स्थिती आहे, पावसाळ्यात या रस्त्यांची स्थिती अधिक गंभीर होईल. रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. प्रशासनाला रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. हे टाळण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, विनोद पोळ, मनोज पाटील, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, सुनीता उबाळे, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, सुजाता काळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी केली आहे. पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था अशीच राहिल्यास, जनतेला त्रास झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
उपोषण, धरणे आंदोलन करणार
खडीकरण, डांबरीकरणाच्या कामापूर्वी रस्त्याचे रोलरने सपाटीकरण करावे, तात्पुरती दुरुस्ती करावी, या मागणीसाठी १६ मार्चला रहिवाशी रस्त्यावर उतरले. ठिय्या आंदोलन, निदर्शने केली. महापालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत पठे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पावसामुळे चिखल असल्याने दोन दिवसांनंतर रोलरने काम करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. बारा दिवसांनंतर परिस्थिती जैसे थे आहे, याच्या निषेधार्थ रहिवाशांसह बेमुदत धरणे आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे.