नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभाग क्रमांक २४ मध्ये गॅस पाईपलाईनमुळे खोदलेले रस्ते दुरूस्त करावेत, पावसाळी गटार टाकण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी तिडकेनगर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने गुरुवारी १६ मार्च २०२३ रोजी रहिवाशांसह निदर्शने करीत ठिय्या आंदोलन केले. महापालिका अधिकार्यांनी चर्चा केली, पाहणी करून समस्या दूर करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रभाग २४ (नवीन ३०) मध्ये गेल्या काही दिवसांपासून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. हे रस्ते त्वरित दुरूस्त करावेत, असा इशारा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने महापालिकेला दिला होता. यानंतर एकाच रस्त्यावरची माती हटविण्यात आली. इतर सर्व ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे कामच झाले नाही. गुरुवारी मध्यरात्रीच्या पावसाने या रस्त्यांवर चिखल पसरला, नागरिकांना घरात ये-जा करणे कठीण झाले, वाहने व नागरिक रस्त्यांवरून स्लीप होवू लागले. पावसाळी गटार नसल्याने थोड्याशा पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले. यामुळे रहिवाशी संतप्त झाले. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशी तिडकेनगर येथे जमा झाले. समस्या दूर करण्याच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
एक तासानंतर महापालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत पठे, शाखा अभियंता जगदिश रत्नपारखी, रंगनाथ गुंजाळ, हिरामण दातीर यांनी आंदोलकांशी चर्चा केली, समस्यांची पाहणी करून माहिती घेतली. रस्त्यावरील चिखलमाती हटविण्यात येईल, रोलरने सपाटीकरण करण्यात येईल, तुटणारे पाणी व वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात येतील, पावसाळी गटार टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, नंदिनी नदीत पाणी साठल्याने सुटलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, यासह सर्व संबंधित समस्या दूर करण्यात येतील, असे आश्वासन या अधिकार्यांनी दिले. गॅस पाईपलाईन कंपनीचे अधिकारी व ठेकेदारांनाही काम करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, संदीप महाजन, रमेश शिंदे, अशोक गांगुर्डे, श्रीकृष्ण जावळे, बन्सीलाल पाटील, फकिरराव तिडके, सतिश मणिआर, अनंत संगमनेरकर, अनिल कराड, संजय तिडके, दीपक गहिवड, सचिन राणे, सुग्रीव मल्ला, अशोक पाटील, विलास सोमवंशी, उदय शिवदे, चंद्रकिशोर पाटील, अनिल पटेल, अश्विनी मणिआर, शोभा मणिआर, सुनीता पाटील, अश्विनी महाजन, पार्वताबाई पिंगळे यांच्यासह रहिवाशी सहभागी झाले होते.