नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात कर्मयोगीनगरहून पाटीलनगर, बडदेनगर रस्त्याला जोडणार्या अठरा मीटर रस्त्यासाठी, तसेच गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक नूतनीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यासह उद्याने व सभागृहांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश आले आहे. विकासकामांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. जनहितासाठी प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनकडून देण्यात आला आहे.
प्रभाग २४ मधील विविध समस्या सोडविणे व विकासकामांसाठी आर्थिक तरतूद करणे यासाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने वेळोवेळी आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात आला. यासंदर्भात शिष्टमंडळासह प्रत्यक्ष भेट घेवून १९ मे २०२२, ६ ऑक्टोबर २०२२ आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी निवेदने दिली. यातील काही मागण्यांची दखल घेतली गेली आहे. कर्मयोगीनगरहून पाटीलनगर-बडदेनगर रस्त्याला जोडणारा अठरा मीटर रस्ता विकसित करण्यासाठी ‘भामरे मिसळ ते रणभुमी रस्ता विकसित करणे’ या शीर्षकाखाली पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी ‘जॉगिंग ट्रॅक नूतनीकरण करणे, भिंत बांधून इतर कामे करणे’ या शीर्षकाखाली २२ लाख ४५ हजार ३८ रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. प्रभागातील उद्यानांमध्ये खेळणी बसविणे व विद्युत प्रकाशाची व्यवस्था करणे यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.
सर्वांगीण सुविधांसाठी आंदोलन करणार
आर डी सर्कल ते बाजीरावनगर रस्ता रुंदीकरण करून तेथे जॉगिंग ट्रॅक करणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिटी सेंटर मॉल सिग्नल पुलाच्या रुंदीकरणासाठी बॉक्स कल्व्हर्ट करणे, चार एकर जागेत पार्क विकसित करणे, अनेक भागातील मुख्य व अंतर्गत रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण करणे, पावसाळी गटार टाकणे, मोकळ्या भूखंडांचे संरक्षण व विकास, नवीन वसाहतीत पाण्याची पाईपलाईन टाकणे यासह विविध कामांसाठी तरतूदच धरण्यात आलेली नाही. याचा प्रभागातील नागरिकांना दरवर्षीप्रमाणे विशेषत: पावसाळ्यात जास्त त्रास होणार आहे. या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे.
माजी नगरसेवकाकडून ‘श्रेय’चोरी
प्रभागातील रहिवाशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांना सोबत घेवून आयुक्तांना निवेदने दिली, अधिकार्यांकडे पाठपुरावा केला, अधिकार्यांनी समस्यांची पाहणी केली, याचे फोटो, निवेदने, वृत्तपत्रांतील बातम्या याचे पुरावे शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनकडे आहेत. मात्र, या कामांची ‘श्रेय’चोरी एक माजी नगरसेवक करीत आहे. आपल्यामुळेच वरील कामांसाठी तरतूद झाली, न केलेली कामेही आपणच केली, अशी दिशाभूल करणारी धादांत सविस्तर खोटी माहिती समाज माध्यमातून पसरवित आहे. समजूतदार मतदार योग्यवेळी ‘श्रेय’चोरीला भूल देवून ‘घंटी’चा खोटा आवाज बंद करतील. तूर्त तरी कानाला इजा नको म्हणून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वरील कामांसाठी बोटभर चिठ्ठीच्या निवेदनाचा किंवा प्रशासनाकडे ओठ हलवून पुटपुट केल्याचा पुरावातरी या श्रेयचोराकडे आहे का, असा सवाल शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केला आहे.