नाशिक – कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ रवींद्र सोनवणे यांनी काही ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञचे एक कृती दल ( टास्क फोर्स) स्थापन केले. या चमूने लहान मुलांमध्ये कोविड आजारास प्रतिबंधात्मक उपाययोजना, आजाराची लक्षणे, त्यासाठी तीव्रता कमी जास्त असताना करावयाचे उपचार, मुलांची मानसिक अवस्था ठीक राहण्याच्या दृष्टीने घेण्याची खबरदारी, गृह विलगिकरणात असताना नोंद ठेवण्याच्या गोष्टी अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करून एक अहवाल तयार केला आहे.
यामध्ये शाळा सुरू कराव्या लागतील आणि त्यावेळी घेण्याची खबरदारी या विषयी देखील उहापोह केला आहे. अशा रीतीने एक सर्वंकष विचार,स्वतःहून या तज्ज्ञ मंडळींनी मांडला आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांना सदर अहवाल सादर केला. जिल्हाधिकारींनी त्यांच्या मनातील काही विचार, संकल्पना बोलून दाखवल्या. अत्यंत साधकबाधक चर्चा केली. त्यांच्या कल्पना आणि मुद्दे आम्ही विचारात घेतले आहे हे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ रवींद्र सोनवणे यांनी नाशिक शहर आणि जिल्हयातील, बालरुग्णांसाठी उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती दिली.
तसेच डॉ पंकज गाजरे यांनी एकूण रुग्ण किती असतील किंवा काय सुविधा लागू शकतील याची कल्पना दिली. डॉ. मिलिंद भराडिया आणि डॉ. रमाकांत पाटील यांनी कोविड आणि नॅान कोविड अशी काटेकोर विभागणी लहान मुलांमध्ये करणे व्यवहार्य नाही, हा मुद्दा मांडला. त्यासाठी कोविड साठीची सर्व खबरदारी घेऊन सर्व रुग्णालयांना त्यावर उपचार करण्याची परवानगी देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. असे केल्यास सरकारी यंत्रणेवरील ताण कमी होईल आणि बालरोग उपचारात प्रशिक्षित मनुष्यबळ कामी येईल. आयएमए महाराष्ट्र राज्य कृती समिती अध्यक्ष डॉ राजेंद्र कुलकर्णी यांनी काही काळात विशेष काळजी घेऊन शाळा सुरु करणे कसे आवश्यक आणि शक्य आहे, या विषयी मत मांडले .
बालरोग तज्ज्ञ संघटनेचेराज्य सचिव डॉ सदाचार उजलांबकर यांनी ग्रामीण आणि निमशहरी भागातील डॉक्टरांचा राज्य कृती दलात समावेश असावा अशी मागणी केली .जिल्हाधिकारी यांनी आवश्यक औषधे, यंत्रसामुग्री यांचा अभ्यास करून
माहिती सादर करण्यास सांगितले. शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ पंकज गाजरे यांना त्यांनी या मोहिमेचे नेतृत्व करण्यास सांगितले आहे. त्यांची incident commander म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर कृती दलाचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी सुचवलेल्या काही गोष्टी सह, शासनाला सादर केला जाईल. या कोविड कृती दलामध्ये अध्यक्ष आणि डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग चिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ.रवींद्र सोनवणे, डॉ.सदाचार उजळंबकर, डॉ.रमाकांत पाटील, डॉ.राजेंद्र कुलकर्णी माजी केंद्रीय उपाध्यक्ष डॉ.केदार माळवतकर, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.वैभव पुस्तके, डॉ.मिलिंद भराडिया, डॉ.पंकज गाजरे, डॉ.संदीप वासनकर, डॉ.संजय आहेर, डॉ.सुशील पारख, डॉ.प्रशांत कुटे, डॉ.अमोल मुरकुटे, सह सचिव डॉ.अक्षय पाटील, खजिनदार डॉ.गौरव नेरकर आदी सदस्यांचा समावेश आहे.