नाशिक – प्रभाग क्रमांक २४ मधील खांडे मळा येथील लासुरे हॉस्पिटल ते मनोमय, दक्षता सोसायटीपर्यंतच्या रस्ता खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाला मंगळवारी, ३० नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यामुळे यश आले असून, परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खांडे मळा येथील लासुरे हॉस्पिटल ते मनोमय अपार्टमेंट, दक्षता सोसायटीपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली होती. पायी चालणेही अशक्य झाल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी होत होती. याची दखल शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने घेत महापालिकेकडे पाठपुरावा केला. जुलैत पावसाळ्यामुळे लगेचच डांबरीकरण शक्य नसल्याने तातडीने खडीकरण करण्याची मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे यांच्यासह रहिवाशांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि तत्कालीन शहर अभियंता संजय घुगे यांच्याकडे २२ जुलै २०२१ रोजी निवेदनाद्वारे केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी खड्डे बुजवून मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता मंगळवारी, ३० नोव्हेंबर रोजी या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पाठपुराव्यामुळे रस्ते दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागला, याबद्दल रहिवाशांनी फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.