नाशिक – शहरातील वाहणा – या नद्या, उपनद्या यांची सातत्याने स्वच्छता व्हावी , शहरातील प्रदूषण कमी व्हावे तसेच महानगरपालिका हद्दीतील मलजल व्यवस्थापन सुरळीत असावे यासाठी चार मलनि :सारण केंद्राच्या अधुनिकीकरणाचा प्रस्ताव आयुक्त कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासनाने तयार केला आहे .नदी संवर्धन योजनेत नाशिक महानगरपालिकेचा समावेश व्हावा आणि त्यासाठीची मान्यता तसेच शिफारस राज्यशासनाकडून केंद्रशासनाला करण्यात यावी यासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाने आज राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे सुपूर्द केला आहे.सदर प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी चारशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित खासदार हेमंत गोडसे यांनी आज मंत्रालयात पर्यावरण विभागाचे राज्याचे सचिव मनिषा वर्मा यांची भेट घेत शहर प्रदुषणमुक्त करण्यासाठी आणि गोदावरीच्या संवर्धनासाठी ही योजना अत्यंत गरजेची असून सदर प्रस्ताव लवकरात लवकर केंद्राकडे पाठविण्याच्या सुचना केल्या.
नाशिक महानगरपालिका हद्दीत अनेक नद्या – उपनद्या आहेत .नदीनाल्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्याने अनेकदा शहरातील प्रदुषणामध्ये वाढ होत असते . आजमितीस शहरात आठ रिव्हरगेज झोन असून प्रत्येक झोनमध्ये मलनिःसारण केंद्र आहे . आगर टाकळी , चेहडी , पंचक , गंगापूर , तपोवन याठिकाणी मलनि : सारण केंद्र सुरू असून या केंद्रांची स्थापित क्षमता ३६० एमएलडी इतकी आहे . तर पिंपळगाव खांब येथे प्रस्तावित मलनिःसारण केंद्र आहे . या प्रस्तावित केंद्राची स्थापित क्षमता ३२ एमएलडी इतकी असणार आहे . यापूर्वी उभारलेले मलनि : सारण केंद्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेले आहे . मात्र असे असले तरी अलीकडे केंद्रीय तसेच राज्य प्रदुषण महामंडळामार्फत प्रक्रियेनंतर सोडण्यात येणा – या मलजलाच्या निकषात कडक बदल करण्यात आल्याने शहरातील मलनि : सारण केंद्राचे अधुनिकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे .केंद्राच्या नदी संवर्धन योजनेतून शहरातील मलनि: सारण केंद्रांच्या आधुनिकीकरण करणे शक्य होणार असल्याने या योजनेत नाशिक महानगरपालिकेचा समावेश व्हावा आणि मलनि सारण केंद्राचे अधुनिकरणासाठी केंद्राने निधी द्यावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार गोडसे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत . यातूनच खासदार गोडसे यांनी काही महिन्यांपूर्वी महानगर पालिकेला परिपूर्ण डीपी आवाज तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या.
शहरातील मलनि : सारण केंद्राच्या अत्याधुनिकरणाचा महानगरपालिका प्रशासनाने नुकताच विशेष डिपीआर तयार केला आहे . सदर डीपीआरचा सविस्तर अहवाल निधीच्या उपलब्धतेसाठी आणि मान्यतेकामी केंद्राकडे पाठविण्यासाठी आज महानगरपालिका प्रशासनाने राज्याच्या पर्यावरण विभागाला सादर केला आहे तपोवन , आगर टाकळी , चेहडी , पंचक या ठिकाणच्या मलनि : सारण केंद्रांच्या अधुनिकरणासाठी आणि पुढील पाच वर्षे दुरूस्तीसह देखभाल करण्यासाठी चारशे कोटी रूपयांचा निधीची आवश्यकता असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे . मनपा क्षेत्रातील जलमल व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असून उच्च न्यायालयानेही नविन मानंकानुसार जलनि : सारण केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचे निर्देश दिलेले असल्याने सदरचा प्रस्ताव निधी उपलब्धेतेसाठी आणि मान्यतेसाठी शिफारस करून केंद्राकडे लवकरात लवकर पाठविण्याची विनंती मनपा प्रशासनाकडून राज्य पर्यावरण विभागाला करण्यात आली आहे. सदरचा प्रस्ताव तातडीने मार्गी लागण्यासाठी आज खा.गोडसे यांनी मंत्रालयात जावून पर्यावरण विभागाच्या सेक्रेटरी मनिषा वर्मा यांची भेट घेतली. नाशिक शहरातील प्रदुषणाला आळा बसविण्यासाठी हा प्रस्ताव अत्यंत महत्वाचा असून लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवावा अशी सुचना यावेळी खा गोडसे यांनी मनिषा वर्मा यांना केल्या आहेत .