नाशिक- डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यासह साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर हेडगेवारनगर, उंटवाडी, कालिका पार्क, तिडकेनगर भागात महापालिकेतर्फे डास निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. धूर आणि औषध फवारणी करण्यात आली. शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनने याबाबत मागणी केली होती. सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील हेडगेवारनगर, पाटीलनगर, उंटवाडी, प्रभाग क्रमांक २४ मधील जगतापनगर, तिडकेनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क आदी भागात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, टायफाईडसह साथीच्या आजारांचे रुग्णही वाढले आहेत. या भागात डास निर्मूलन मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनने महापालिका विभागीय अधिकारी मयुर पाटील, जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याकडे केली होती.
या भागात शुक्रवारी व सोमवारी धूर फवारणी करण्यात आली. मंगळवारी ३ आणि बुधवारी ४ ऑगस्ट रोजी औषधी फवारणी करण्यात आली. हौसिंग सोसायट्या आणि घरोघरी जावून जनजागृती करण्यात आली. साचलेल्या पाण्याचे डबके, कुंड्यांसह रहिवाशी परिसरातील डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली. डास निर्मूलन मोहिमेअंतर्गत फवारणी करताना महापालिकेच्या या पथकाबरोबर सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, श्रीकांत नाईक, मगन तलवार, मनोज वाणी, मकरंद पुरेकर, विजय कांडेकर, रवींद्र सोनजे, अशोक पाटील, डॉ. राजाराम चोपडे आदी हजर होते.