सिडको – आमदार बच्चू कडू यांच्या वादग्रस्त विधानामुळे आमच्या समाजातील तरुण पदाधिकाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्यमंत्री बच्चू कडू असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुवर्णकार समाजाचे पदाधिकारी संजय मंडलिक यांनी केली आहे. वादग्रस्त विधान करणाऱ्या बच्चू कडू यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात यावा या मागणी करता सुवर्णकार समाजाने मंगळवारी सराफ बाजार येथे काळ्या फिती लावून निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी आंदोलकांना सरकारवाडा पोलिसांनी अटक देखील केली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हिंदू धर्मातील समाजा बाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तणावात येऊन समाजातील एका पदाधिकाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्य झाला आहे. कडू यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी सुवर्णकार बंधूंनी आयोजित शोकसभेत केली. यावेळी कडू यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या, शोक सभेचे रूपांतर आंदोलनात झाले. काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आयोजकांना अटक केली. यावेळी सुवर्णकार समाजाचे संजय मंडलिक, गजू घोडके, सुनील महालकर, राजेंद्र दिंडोरकर, विनोद थोरात, राजेंद्र कुलथे, बाळासाहेब कुलथे, संजय दंडगव्हाळ, कृष्णा बागुल, उषाबाई माळवे व सारिका ताई नागरे व सर्वशाखीय सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.