तिडकेनगर, कर्मयोगीनगरमध्ये महावितरणने घेतली दखल
नाशिक – शिवसंपर्क अभियानाअंतर्गत सुरू केलेल्या समस्या निवारण मोहिमेला यश येत आहे. तिडकेनगर, कर्मयोगीनगर येथे महावितरण कंपनीने विद्युत प्रवाह नसलेल्या लोंबकळणाऱ्या धोकादायक तारा आणि पोलही काढून टाकले.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत उंटवाडी, पाटीलनगर, हेडगेवारनगर भागात शिवसेनेने समस्या निवारण मोहीम सुरू केली आहे. तिडकेनगर, कर्मयोगीनगरमधील विद्युत प्रवाह नसलेल्या लोंबकळणाऱ्या तारा आणि वाकलेल्या विद्युत पोलमुळे अपघात होवून जीवितहानी होण्याची शक्यता होती. ही बाब महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याची दखल घेत तीनच दिवसात तात्याश्री चौक, प्रियंका पार्क, छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळा या परिसरातील धोकादायक तारा आणि विद्युत पोल काढून टाकण्यात आले. जगतापनगर येथील उघड्या डीपीचा तुटलेला दरवाजा बसविण्यात आला. कालिका पार्क येथील श्रीराम व वैशाली रो-हाऊसमागील वाकलेला पोल काढण्यात आला. कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, सहाय्यक अभियंता प्रदीप गवई यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन दीपक शिर्के, किशोर वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी हे काम केले.
सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, शिवसैनिक बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, श्रीकांत नाईक, प्रभाकर खैरनार, पुरुषोत्तम शिरोडे, दीपक दुट्टे, बाळासाहेब दुसाने, यशवंत जाधव, परेश येवले, विजय शिरोडे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. शशिकांत मोरे, नीलेश ठाकूर, अशोक पाटील, ज्ञानेश्वर महाले, नाना खैरनार आदींनी महावितरणचे आभार मानले आहे.