डॉ.भागवत- स्वामी सवितानंद यांचा अमृतमहोत्सवानिमित्त हदय् सत्कार
…
श्रीकृष्ण कुलकर्णी
नाशिकः भारतीय संस्कृती ही अध्यात्मिक,भौतिक विचारांनी गुंफली आहे. या दोन्ही प्रक्रियेत विचार एकसारखा नसतो तसेच स्विकारणे नाकारणे हे सुध्दा सर्वस्वी व्यक्तीवरच असते. साधु महंत,महात्म्यांच्या माध्यमांतून या विचारांपर्यत पोहचता येते आणि हेच विचार माणसांचे जीवन समृध्द करतात असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.
तरसाडा(बार,द.गुजरात) येथील स्वामी श्री सवितानंद अमृतमहोत्सव समिती व साधक परिवारातर्फे आज स्वामी सवितानंद यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार नक्षत्र लॉन्समध्ये झाला. डॉ.भागवत यांच्याहस्ते स्वामी संवितानंद यांना मानपत्र,शाल,पुष्पगुच्छ देऊन गौरव झाला. यानिमित्ताने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ.भागवत यांनी केले. स्वामीजी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा एक ऋणानुबंध असून कितीही अडथळे आले तरी तो अधिक वृध्दींगत होतच राहिल असे नमूद डॉ.भागवत म्हणाले, आजच्या काळातील प्रवाह आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अध्यात्मिक,भौतिक विचार स्विकारणे,नाकारणे हे अवघड आहे. खरा वैज्ञानिक दृष्टीकोन सुध्दा दिसणारी बाब मान्य करेलच हे सांगू शकत नाही. सर्वसाचा त्याग करून अध्यात्मिक जीवन स्विकारत साधुमहंत विचारांचे प्रशिक्षण देण्याचे काम करतात. प्रपंच हा परमार्थशिवाय नाही हे जरी खरं असलंतरी परमात्माचे चिंतन,मनन हे वैराग्यातून प्राप्त होऊ शकते, मात्र हे सारं परिस्थितीनुसार असते,हे सांगतांना त्यांनी गीतेतील श्रीकृष्ण,अर्जुनाचे उदाहरण दिले.
…..
नव्या पिढीला अनुभूती हवी
प्राचीन भारतीय संस्कृती ही काही नाही असे आपण म्हणतो, पण भारतीय संस्कृती परंपरा होणाऱ्या टिकास्त्रला छेदून गेलेली दिसते, भारतीय संस्कृतीचा युगानयुगाचा प्रारंभ आपणाला सांगता येत नाही. असे नमूद ते म्हणाले,
आज नवीन पिढी खूप हुशार,जिज्ञासू आहे. ही सहजपणे काहीही मानायला तयार नसते. तर्क,पुरावा,प्रमाण हे त्यांना सांगावे लागते तरच ते विश्वास ठेवतात, त्यासाठी आपणाला विविध बाबींचे ज्ञान असलेतर आपण त्यांची ज्ञानाची भूक भागवू शकतो. भारतीय विचार,संस्कृती,परंपरा हा आपल्या ठेवा आहे. हा ठेवा संत महात्म्यांकडे आहे. किर्तन,प्रवचनासारख्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होत असून संघाचे कार्य हेच भारतीय संस्कृती,परंपरा,राष्ट्रउभारणी चे विचार आपल्या स्वयंसेवकांद्वारे लोकसंग्रहातून करतांना दिसतात.
….
पॅराशूटचे काम साधकाने करावे
स्वामी सवितानंद यांनी विविध उदाहरणे देत जीवनाचे महत्व पटवून दिले.परमात्मा हा प्रकाशानुसार प्रत्येक ठिकाणी पोहचतो आणि फक्त बल्ब आहोत हे लक्षात घ्यावे. आपण विचारातून व्यक्त होतो, यदा यदा ही धर्मस्य..या गीतांच्या श्लोकांद्वारे जीवनाचे सारं सांगितले आहे,पण ती परिस्थिती वेगळी होती. पॅराशूट ज्याप्रमाणे एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपले कार्य करते, त्याचपध्दतीने साधकांनी प्रचार,प्रसाराचे काम करावे. दोन बिंदूना जोडल्यानंतर रेषा बनते. याच बिंदूच्या सिध्दांताप्रमाणे आपल्याला ईश्वरसाधनेबरोबरच राष्ट्रनिष्ठा जपण्याचे काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. सुरवातीला विद्या नृसिंह भारती शंकराचार्य यांचा संदेश वाचन झाले. यावेळी विविध मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. वैद्य योगेश जिरंकल यांनी मानपत्राचे वाचन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
—-
असाही मदतीचा हात
वैद्य योगेश जिरंकल यांना पेटंटच्या रूपाने मिळालेल्या एक लाख रूपयांची रक्कम आणि स्वामीच्या सत्कार समितीच्यावतीने माजी सैनिकांसाठी तीन लाखांच्या मदतीचा धनादेश डॉ.भागवत यांच्याहस्ते बाळासाहेब उपासनी व सहकाऱ्यांना देण्यात आला. त्यानंतर याच समितीतर्फे श्रीरामजन्मभूमी मंदीरासाठी न्यासाच्या वतीने श्री.मणियार यांच्याकडे तीन लाखांचा धनादेश देण्यात आला. पेटंट मिळाल्याबद्दल डॉ.भागवत यांच्या हस्ते जिरंकल यांचा विशेष सत्कार झाला.