नाशिक – तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगरमध्ये १२ जुलैपासून शिवसंपर्क अभियानाअंतर्गत समस्या निवारण मोहिमेला प्रारंभ झाला. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक उघडी डीपी आणि लोंबकळणाऱ्या तारांची पाहणी केली, हे प्रश्न त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले. महापालिकेने बंद पडलेल्या बोअरवेलचा विद्युतपंप दुरुस्तीसाठी नेला. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२ ते २४ जुलै या काळात राज्यभर शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत समस्या निवारण मोहिमेला आज सोमवारी, १२ जुलैला तिडकेनगर येथे प्रारंभ झाला. जगतापनगर येथे उंटवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ४४० व्होल्टच्या डीपीचा एक दरवाजा तुटल्याने ती उघडी आहे, तिला स्पर्श झाल्यास जीवितहानीची शक्यता आहे. तिडकेनगर येथे प्राची बिल्डींगपासून प्रियंका पार्क रस्त्यावर गेल्या पाच वर्षांपासून विद्युत प्रवाह नसलेली तार लोंबकळलेली आहे. हीच स्थिती कर्मयोगीनगर येथे छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळेजवळ आहे. या तारा खाली पडल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. वाकलेले विद्युत पोलही आहेत.
शिवसैनिक व सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख) यांनी याबाबत तक्रार केली होती. वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, सहाय्यक अभियंता प्रदीप गवई, कर्मचारी दीपक शिर्के यांनी सोमवारी या ठिकाणी पाहणी केली. ही समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले. प्रियंका पार्क येथे महापालिकेच्या भूखंडावरील बोअरवेल काही वर्षांपासून बंद आहे, तेथील विद्युत मोटर बाहेर काढून महापालिकेने दुरुस्तीसाठी नेली. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, पुरुषोत्तम शिरोडे, श्रीकांत नाईक, प्रभाकर खैरनार, संजय टकले, राजाराम चोपडे, प्रथमेश पाटील आदी हजर होते. शिवसेनेने समस्या सोडविण्यास सुरुवात केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.