नाशिक – कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, अनेक ज्येष्ठ नागरिक, विविध आजारांनी त्रस्त व्यक्ती, दिव्यांग हे केंद्रापर्यंत येऊ शकत नसल्याने लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे, हे टाळण्यासाठी महापालिकेने तात्काळ पावले उचलत त्यांच्यासाठी घरी जाऊन लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने महापालिकेकडे केली आहे. मंगळवारी, ६ जुलै रोजी याबाबतचे निवेदन आयुक्त कैलास जाधव यांना देण्यात आले आहे.
विविध आजारांनी त्रस्त नागरिक केंद्रापर्यंत येऊ शकत नाही, जास्त वेळ रांगेत उभे राहू शकत नाहीत. दिव्यांग तसेच ज्येष्ठांनाही हीच अडचण आहे. अनेकांची मुले परदेशात, तसेच देशात इतरत्र नोकरीसाठी असल्याने ते एकटेच राहतात, त्यांनाही लसीकरण केंद्र गाठणे शक्य होत नाही. असे सर्व नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महापालिकेने त्यांचे घरी जाऊन लसीकरण करावे. तसेच ज्या व्यक्तींना केंद्रापर्यंत आणणे शक्य आहे; परंतु त्यांना उचलून केंद्रात न्यावे लागेल, अशांचे त्यांच्या वाहनातच लसीकरण करण्याची सूचना वैद्यकीय पथकाला द्यावी. तिडकेनगर, कर्मयोगीनगर, हेडगेवारनगर, पाटीलनगर, प्रियंका पार्क, कालिका पार्क, त्रिमूर्ती चौक, गोविंदनगर, खांडे मळा या भागात ही सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, दै. सामनाचे पत्रकार बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, दीपक दुट्टे, दिलीप रौंदळ, दिलीप दिवाने, नितीन तिडके, हंसराज वडघुले, आशुतोष तिडके, बापू आहेर, ज्ञानेश्वर महाले, डॉ. प्रशांत वाणी, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. शशिकांत मोरे, मंदार सडेकर, संजय टकले, सचिन जाधव, राहुल कदम, वैभव कुलकर्णी, सचिन राणे, पुरुषोत्तम शिरोडे, बाळासाहेब दुसाने, विनोद पोळ, मकरंद पुरेकर, मनोज वाणी, मगन तलवार, कांचन महाजन, नीलिमा चौधरी, चैताली सोनवणे, उज्ज्वला सोनजे, धवल खैरनार, वंदना पाटील, साधना कुवर, संगिता देशमुख, पल्लवी रनाळकर, भारती गजरूशी, सरीता पाटील, सुनीता उबाळे, ज्योत्स्ना पाटील, संध्या आहेर, संगिता नाफडे, रेखा भालेराव, मनीषा मराठे, संध्या बोराडे, किरण पाटील, वैशाली पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सर्वेक्षण हाती घ्या
शहरातील विविध आजारांनी त्रस्त व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व केंद्रापर्यंत येवू न शकणारे दिव्यांग यांची महापालिकेकडे माहिती उपलब्ध असेल, तर त्वरित त्यांच्या घरी जाऊन लसीकरणाची सोय करावी. माहिती उपलब्ध नसेल तर त्वरित सर्वेक्षण करून पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.