नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रिंग प्लस अॅक्वा लि. (रेमंडस ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महानगरपालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयातील नवजात शिशु विभागास सहा बबल सिपेप मशीन्स प्रदान करण्यात आले. या मदतीमुळे बालरुग्णांना उपयोग होणार आहे.
बिटको रुग्णालयात या मशीन्सची नितांत गरज होती. केवळ नाशिकरोडच नव्हे तर आसपासच्या बालरुग्णांची ही गरज लक्षात घेवून, रोटरी क्लब ऑफ नाशिकने सामाजिक भावनेतून असे अत्याधुनिक मशीन्स पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी रेमंडस ग्रुपच्या रिंग प्लस अॅक्वा लि. यांनी सीएसआरच्या अंतर्गत तातडीने आर्थिक मदत देऊ केली. रोटरीचे मनोनीत प्रांतपाल रमेश मेहेर, उप प्रांतपाल कुणाल शर्मा, रिंग प्लस अॅक्वाच्या सिन्नर युनिटचे प्रमुख कमलाकर टाक, अविल त्यागी यांच्या उपस्थितीत ही मशीन्स प्रदान करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया डॉ. श्रिया कुलकर्णी, रोटरी ट्रस्टचे विश्वस्त तथा माजी अध्यक्ष अनिल सुकेणकर, माजी अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, बिटको रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शिल्पा दयानंद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. रोटरीचे सचिव तथा सीएसआर संचालक प्रफुल बरडिया यांनी यासाठी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वीच नवजात शिशुसाठी चार सी-पेप मशीन व पोर्टेबल एक्स-रे मशीन रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे प्रदान करण्यात आले होते. रोटरी क्लब नासिकच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.