नाशिक – शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या वतीने ‘ज्ञानज्योती घरोघरी’ या उपक्रमांतर्गत गरीब कुटुंबातील मुलांसाठी शैक्षणिक मदतीचा प्रवाह अखंडीतपणे सुरू आहे. रविवारी आणखी तीन दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. ”संकटाच्या काळात आम्हाला सत्कार्य फाऊंडेशनने शिक्षणासाठी हा लाखमोलाचा आधार दिला, ही मदत कधीही विसरणार नाही, या संधीतून उज्ज्वल भविष्य घडवू” अशा शब्दात मुलांनी व पालकांनी आपली भावना व्यक्त केली.
आधीच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबांचे कोरोनाने जगणे मुश्कील केले, अशा कुटुंबातील मुलांचे शिक्षण थांबू नये या भावनेतून शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने *’ज्ञानज्योती घरोघरी’* उपक्रमाअंतर्गत दानशूर व्यक्तींना या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्याबाबत आवाहन केले. या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत दानशूर पुढे येत आहेत. त्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्याचे काम सुरू आहे. रविवारी, दि. २० जून रोजी आणखी तीन दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, कंपास आणि दप्तर देण्यात आले.
बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करणाऱ्या वडीलांचे काम कोरोनाने थांबले. आई इतरांकडे पोळ्या लाटण्याचे काम करते अशी हालाखीची परिस्थिती असलेल्या सिडकोतील हेडगेवार चौकातील काजल रमेश कापसे हिला शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सावतानगरच्या शनी चौकातील योगेश विलास वैद्य याची आई धुणी-भांड्याची कामे करते, तर वडील ड्रायव्हर आहेत. उंटवाडीतील तिडकेनगरमधील सुनील शिरसाठ हे मजुरी करतात, अपंग पत्नी धुणी-भांड्याचे काम करते, त्यांची मुलगी माधुरी हिला शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख), वंदना पाटील, उज्ज्वला सोनजे, भारती गजरुशी, मनिषा मराठे, मीना टकले, धवल खैरनार, संगिता देशमुख, दै. ‘सामना’चे पत्रकार, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, यशवंत जाधव, अशोक पाटील, संकेत गायकवाड (देशमुख), दीपक दुट्टे, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार आदी उपस्थित होते.