नाशिक – लग्न समारंभांना शनिवारी व रविवारी परवानगी मिळावी, अशी आग्रही मागणी नाशिक मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल असोसिएशनने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात असोसिएनने पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, १६ जून ते १३ जुलैपर्यंत १० विवाह मुहूर्त आहेत. त्यातील ४ विवाह मुहूर्त हे शनिवार व रविवारचे आहे. त्यामुळे या मुहूर्तावर लग्न असणा-यां पुढे विवाह ढकलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पुढील शुभकार्य सुध्दा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. तसेच नोकरदार वर्गाचे परिवाराचे घरातील लग्नकार्य हे शनिवारी व रविवारी करण्याचा कल असतो. आता फक्त पुढील १५० दिवसात फक्त १२ ते १४ दिवस लग्नकार्य चालणार आहेत. अन्य दिवशी मंगल कार्यालय बंदच राहतील. त्यामुळे शनिवार व रविवारी लग्न समारंभांना परवानगी द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या घटत आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत सकारात्मक विचार करुन अटी व शर्थींसह परवानगी द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चोपडा, कार्याध्यक्ष संदीप काकड, सेंक्रेटरी शंकरराव पिंगळे, सहसेंक्रेटरी समाधान जेजुरकर, प्रवीण कमले आदी यावेळी उपस्थित होते.