नाशिक – कोरोना काळात रोजगार गमावलेले कोणतेही कष्टकरी कुटुंब उपाशी राहू नये या तळमळीने नाशिक येथील खासगी क्लासेसचे संचालक मनोज पाटील गरजूंना मोफत किराणा पुरवत आहेत. या सेवाव्रतात त्यांचे परदेशस्थित मित्रही सहभागी झाल्याने गरजूंसाठी मदतीचा अखंड स्त्रोत उभा राहीला. हजारो कामगारांना किराणा, रूग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व औषधांचा पुरवठा करत ते उत्तर महाराष्ट्रासह देशभरात अनेकांचा आधार झाले. चांगल्या विचारानिशी टाकलेले एक पाऊल अनेकांना प्रोत्साहन देते आणि आदर्श कार्य घडते याचाच प्रत्यय पाटील यांच्या कार्यातून येतो.
एका कंपनीचे मालक असलेल्या मनोज पाटील यांनी ठिकठिकाणच्या कामगारांचे हाल बघून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकी दहा किलो गहू, तांदूळ, साखर असा संपूर्ण किराणा त्यांनी दीडशेहून अधिक कामगारांना पुरवला. एवढे करून ते थांबले नाही, तर मदत मागण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला ते आधार देत आहेत. रुग्णांना बेड, रेमडेसिवीर मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक महिने झोकून देत काम केले. कुठल्याही प्रसिद्धीविना सुरू असलेल्या या कार्याविषयी कळताच परदेशातील मित्रही सरसावले. दुबईतील मित्र नीलेश चांडक यांनी मदत केलीच, पण इकडची गंभीर परिस्थिती कळताच त्यांचे मॅनेजर स्टीफन यांनीही दोन लाखांची मदत पाठवली. अमेरिकेतील सुनिता पाटील, हेमा पाटील यांनीही सहभाग घेतल्याने बघता-बघता देशभरात २२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप झाले. नांदगाव रूग्णालयाला, शिरूड ग्रामपंचायतीला कॉन्सन्ट्रेटर दिले. त्र्यंबकेश्वरजवळील अनाथ बालकांच्या आश्रमाला ते सातत्याने सहकार्य करीत आहेत. अमेरिकेतील एका शिक्षिका असलेल्या मैत्रिणीनेही तेथील मराठी माणसांना सोबत घेत मदत उभी केली. महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नाश्ता देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव ठाकरे यांना मदत म्हणून ते किराणा उपलब्ध करून देत आहेत.
७७व्या वर्षीही वडील समाजसेवेत कार्यरत
मनोज पाटील यांचे वडील भाईदास पितांबर पाटील हे ७७ वर्षांचे आहेत. ग्रामसेवक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर सन २००२ पासून ते जळगाव जिल्ह्यातील शिरूड या मूळगावी राहतात. तेथे सरपंच म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कोरोना काळात त्यांनीही गरजूंच्या मदतीसाठी झोकून दिले आहे.