शिवसेना, ‘सत्कार्य’ची मागणी, लोकसहभागाची तयारी
नाशिक – सिटी सेंटर मॉलजवळील नंदिनी नदीवरील दोन्ही पुलांवर लोखंडी संरक्षक जाळी बसवावी, नदीच्या दोन्ही बाजूंना वृक्ष, वेली, फुलझाडांची लागवड करून नंदिनी नदीचे सौंदर्यीकरण करावे, प्रदूषण थांबविण्याच्या उपाययोजना करून नदीचे संरक्षण करावे, अशी मागणी शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना परिसरातील रहिवाशांच्या वतीने सोमवारी, ३१ मे रोजी देण्यात आले. या कामासाठी लोकसहभागाचीही तयारी दर्शविण्यात आली आहे.
उंटवाडीतील दोंदे पूल आणि सिटी सेंटर मॉलच्या सिग्नलजवळील पुलावरून नागरिक सातत्याने मोठ्या प्रमाणावर कचरा आणि इतर घाण टाकतात. सांडपाणी आणि कचरा यामुळे नंदिनी नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. अस्वच्छता आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दोन्ही ठिकाणी पुलाच्या वर दोन्ही बाजूंना संरक्षक जाळी बसविल्यास नदीत कचरा फेकण्याला बहुतांशी निर्बंध येईल, नदीचे प्रदूषण थांबण्यास मदत होईल. हेडगेवारनगर ते सिटी सेंटर मॉल सिग्नलपर्यंत नदीपात्राची स्वच्छता करावी, प्रदूषण थांबविण्याच्या आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नदीच्या दोन्ही किनारी आवश्यक त्या वेली, वृक्ष, फुलझाडे यांची तटबंदी करून सौंदर्यीकरण करावे. याबाबत योग्य तो नियोजन आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी परिसरातील नागरिक, शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनचे कार्यकर्ते सहभाग घेतील. लोकसहभागातून हे काम करण्यास महापालिकेने योग्य ते सहकार्य केले तर नदी संवर्धन, पर्यावरण रक्षणाची लोकचळवळ उभी राहू शकते. हे काम करताना नदीकाठच्या खासगी व संस्थांच्या मालमत्तांना कुठलीही बाधा येणार नाही, याची काळजी महापालिकेने घ्यावी, नागरिकही घेतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शनिवारी, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी या कार्यास प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पर्यावरण दिनानिमित्त परिसरातील रस्त्याच्या कडेला नंदिनी नदीकाठी व महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपणास परवानगी द्यावी, मार्गदर्शन व सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेला या निवेदनातून करण्यात आली आहे.
तिडकेनगर, जगतापनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, प्रियंका पार्क, हेडगेवारनगर या भागातील असंख्य नागरिकांच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. यावर दै. ‘सामना’चे पत्रकार, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, चंद्रकिशोर पाटील, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, अशोक पाटील, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. आर. ओ. पाटील, मनोज पाटील, विनायक गिते, बाळासाहेब तिडके, मंदार सडेकर, सचिन जाधव, श्रीकांत नाईक, कुलदीप कुलकर्णी, संजय टकले, धनराज चौधरी, डॉ. सुरेखा बोंडे, कांचन महाजन, नीलिमा चौधरी, दीपाली चौधरी, साधना कुवर, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, धवल खैरनार आदींसह शेकडो नागरिकांच्या यावर सह्या आहेत.