नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या दोघा मित्रांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना दिंडोरीरोडवरील एका हॉटेलमध्ये घडली. या घटनेत लाकडी बांबूसह खुर्चीचा वापर करण्यात आल्याने दोघे मित्र जखमी झाली असून या हाणामारीत एकाची सोनसाखळी गहाळ झाली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष भगवान भामरे (२६ रा.शिवाजीनगर,सातपूर) या युवकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. भामरे व अनिकेत राजेंद्र कापडणीस (रा.शिवाजीनगर,सातपूर) हे दोघे मित्र म्हसरूळ परिसरातील हॉटेल खमंग येथे गेल्या ८ फेब्रुवारी रोजी रात्री जेवणासाठी गेले असता ही घटना घडली.
जेवण करीत असतांना एमएच ०१ एएच १३८८ या होंडा सिटी कारमधून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने कुठलेही कारण नसतांना त्यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या घटनेत लाकडी बांबू आणि लोखंडी खुर्चीचा वापर करण्यात आल्याने दोघे मित्र जखमी झाले आहेत. या हाणामारीत भामरे यांच्या गळयातील पाच तोळे वजनाची सोनसाखळी गहाळ झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.