नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिटी सेंटर मॉल सिग्नलसह गोविंदनगर रस्त्यावरील सततची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करावी, नंदिनी नदीवर पूल बांधून आर डी सर्कल ते बाजीरावनगर रस्ता २४ मीटर रुंदीचा विकसित करण्यात यावा, पर्जन्यवाहिन्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा आदी मागण्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केल्या. प्रभाग २४ मधील विविध समस्यांचा पाढा वाचत त्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी बुधवारी, ८ जानेवारी रोजी महापालिका प्रशासक मनीषा खत्री यांची भेट घेतली. गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉल सिग्नल या शंभर फुटी रस्त्यावर रहिवाशी व व्यापारी संकुले झपाट्याने विकसित होत आहेत. येथे सतत वाहतूक कोंडी होते, ती सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. गोविंदनगर रस्त्याला जोडणारा आर डी सर्कल ते बाजीरावनगर हा रस्ता सध्या फक्त नऊ मीटर अस्तित्वात आहे, विकास आराखड्यानुसार तो २४ मीटर रूंदीचा करावा. नंदिनी नदीवर पूल बांधण्यात यावा. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने हे दोन्हीही रस्ते महत्त्वाचे ठरणार आहेत. रहिवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉकची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. प्रभाग २४ मध्ये ७० टक्के भागात पर्जन्यवाहिन्या नसल्याने पावसाळ्यात रहिवाशांच्या घरात पाणी जाते, रस्त्यांवर तळे साचते. या त्रासातून सुटका होण्यासाठी सन २०२५-२६च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात यावी. खड्डे खडी-डांबराने बुजवून रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे. उद्यानांची दुरवस्था दूर करण्यात यावी. नादुरुस्त व कुजलेले पथदीप काढून नवीन बसवावेत, नववसाहतींमध्ये पथदीपांची व्यवस्था करावी. अनेक भागांमध्ये सतत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तो पुरेसा व सुरळीत करण्यात यावा. मोकळ्या भूखंडांची, तसेच रस्त्यांच्या साईडपट्ट्यांची स्वच्छता करण्यात यावी. गोविंदनगर रस्त्यावरील दुभाजकांमधील काटेरी झुडूपे काढून टाकावीत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, यासह विविध समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगिता देशमुख, उज्ज्वला सोनजे, सुरेखा बोंडे, कांचन महाजन, कल्पना सूर्यवंशी, ज्योत्स्ना लांबट, निर्मला बिरारी, वंदना पाटील, नीलिमा चौधरी, प्रतिभा पाटील, सुजाता टकले, रवींद्र गीते, अनंत संगमनेरकर, संतोष कोठावळे, नरेंद्र दशपुते, प्रभाकर बोरसे, मनोज अट्रावलकर, सतीश मणिआर, संकेत गायकवाड (देशमुख), हरिष काळे आदींसह रहिवाशी उपस्थित होते.