नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम 2021 मधील 50 व्या नियमाच्या उपनियम(8) आणि उपनियम (9) मधील तरतुदींनुसार, सरकारी कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारक याच्या मृत्युनंतर जर जोडीदार जिवंत असेल तर त्या जोडीदाराला कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याचा हक्क प्राधान्याने मिळतो आणि त्या जोडीदाराच्या मृत्यूनंतरच किंवा हे कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास जोडीदार अपात्र ठरल्यास नंतर मृत सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारकाची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पात्र ठरतात.
एखादी महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिला तिच्या पतीऐवजी पात्र अपत्य किंवा एकाहून अधिक अपत्यांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी नामनिर्देशित करू शकते का याबाबत सल्ला मागणाऱ्या विनंत्या केंद्रीय मंत्रालये/विभाग यांच्याकडून मोठ्या प्रमाणात केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाकडे केल्या जात होत्या. विशेषतः वैवाहिक विसंवादातून न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज सादर केला आहे किंवा घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत अथवा हुंडा प्रतिबंधक कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील एखाद्या कलमाअंतर्गत तक्रार दाखल झाली असेल तर अशा वेळी संबंधित महिलेसाठी उपरोल्लेखित सुविधेची तरतूद आहे काय अशी विचारणा या विभागाकडे वारंवार होत होती.
त्याबरहुकूम, आंतर-मंत्रालयीन चर्चांनंतर असा निर्णय घेण्यात आला आहे की, महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिलेच्या संदर्भात न्यायालयात घटस्फोटाची कार्यवाही प्रलंबित असेल किंवा एखाद्या सरकारी कर्मचारी महिलेने / निवृत्तीवेतनधारक महिलेने तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत अथवा हुंडा प्रतिबंधक कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील एखाद्या कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली असेल तर अशा सरकारी कर्मचारी महिलेला / निवृत्तीवेतनधारक महिलेला तिच्या मृत्युनंतर मिळणारे कुटुंब निवृत्तीवेतन तिच्या पतीऐवजी तिच्या पात्र अपत्याला अथवा एकाहून अधिक अपत्यांना मिळावे अशी विनंती ती करू शकते. अशा प्रकारची विनंती खालील पद्धतीने विचारात घेता येईल:
जेथे एखाद्या सरकारी कर्मचारी महिलेच्या / निवृत्तीवेतनधारक महिलेच्या संदर्भात सक्षम न्यायालयात घटस्फोटाची कार्यवाही प्रलंबित असेल किंवा किंवा एखाद्या सरकारी कर्मचारी महिलेने / निवृत्तीवेतनधारक महिलेने तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत अथवा हुंडा प्रतिबंधक कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील एखाद्या कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली असेल तर अशा सरकारी कर्मचारी महिलेचा / निवृत्तीवेतनधारक महिलेचा वरीलपैकी कोणतीही कार्यवाही प्रलंबित असताना दरम्यानच्या कालावधीत मृत्यू झाल्यास मिळणारे कुटुंब निवृत्तीवेतन, तिच्या पतीऐवजी तिच्या सक्षम अपत्याला/ एकाहून अधिक अपत्यांना मिळावे अशा अर्थाची लेखी विनंती तिला संबंधित मुख्य कार्यालयात करावी लागेल;
उपरोल्लेखित कार्यवाही प्रलंबित असताना, महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिलेचा मृत्यू झाल्यास आणि मृत्युपूर्वी तिने वरील मुद्दा क्र.a मध्ये म्हटल्यानुसार लेखी विनंती केलेली असल्यास, कुटुंब निवृत्तीवेतन खालील पद्धतीने वितरीत केले जाईल:
जेथे महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती (विधुर) जिवंत असेल आणि मृत्यू झाल्याच्या तारखेला कोणतेही अपत्य/ अपत्ये कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र ठरत नसतील तर हे कुटुंब निवृत्तीवेतन त्या विधुराला देण्यात येईल.
जेथे महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती (विधुर) जिवंत असेल आणि त्यांच्या अपत्याला/ अपत्यांना मतिमंदत्व किंवा मानसिक आजार अथवा अपंगत्व असेल तर महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र ठरेल मात्र त्यासाठी पती त्यांच्या मुलांचा पालक असणे आवश्यक असेल. जर हा विधुर अशा मुलाचे/मुलांचे पालकत्व सोडून देत असेल तर अशा वेळी हे कुटुंब निवृत्तीवेतन त्या मुलांच्या वास्तविक पालकाला देण्यात येईल. जर अल्पवयीन अपत्य, सज्ञान होण्याच्या वयात आल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतन घेण्यासाठी पात्र ठरत असेल तर अशा अपत्याला सज्ञान झाल्याच्या तारखेपासून कुटुंब निवृत्तीवेतन देय असेल.
जेथे मृत्यू पावलेली महिला सरकारी कर्मचारी / महिला निवृत्तीवेतन धारकाच्या मागे विधुर पती आणि सज्ञान झालेले अपत्य/अपत्ये असतील आणि ती अपत्ये कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पात्र ठरत असतील तर हे कुटुंब निवृत्तीवेतन त्या अपत्याला/अपत्यांना देण्यात येईल.
जर उपरोल्लेखित मुद्दा क्र.(ii) आणि (iii) मध्ये वर्णन केल्यानुसार अपत्य/अपत्ये सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम,2021 मधील 50 व्या नियमानुसार कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरत नसतील तर अशावेळी कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र एक किंवा अधिक अपत्य असल्यास हे कुटुंब निवृत्तीवेतन त्याला/त्यांना द्यावे लागेल.
सर्व अपत्ये सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम,2021 मधील 50 व्या नियमानुसार कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरत नसतील तर अशावेळी त्या विधुराला त्याच्या तहहयात किंवा पुनर्विवाहापर्यंत हे कुटुंब निवृत्तीवेतन देय राहील.
ही सुधारणा अत्यंत प्रागतिक असून महिला कर्मचारी/निवृत्तीवेतनधारक यांना लक्षणीयरित्या सक्षम करणारी आहे.