तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगरमध्ये रस्त्याखाली दबलेल्या चेंबरची दुरुस्ती करणार
नाशिक – शिवसेना आणि रहिवाशांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर भागात पाहणी दौरा केला. रस्त्याखाली दबलेले भुयारी आणि पावसाळी गटारचे चेंबर मोकळे करून दुरुस्त करू, असे आश्वासन दिले.
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मधील काही भागात नुकतेच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. काही भाग अद्याप बाकी आहे. डांबरीकरणापूर्वी व नंतरच्या कामाने भुयारी आणि पावसाळी गटारीचे चेंबर रस्त्याखाली दबलेले आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबून मोठी समस्या निर्माण होईल. याबाबत शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, दैनिक ‘सामना’चे पत्रकार बाबासाहेब गायकवाड (देशमुख), महिला आघाडीच्या कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार करून आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेवून आज गुरुवारी, २० मे रोजी महापालिकेच्या भुयारी गटार व बांधकामच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त दौरा केला. यात कार्यकारी अभियंता नितीन वंजारी, उपअभियंता नितीन पाटील, कॉन्ट्रक्टर अभय चोक्सी, उपअभियंता मोहम्मद काझी, विनायक गांगुर्डे, आर. ई. शिंदे यांचा समावेश होता. रुंग्ठा एम्पेरिया, रुंग्ठा होरायझन, कालिका पार्क, रामराज्य सोसायटी, जगतापनगर, मातोश्री चौक, राजीव गांधी उद्यान, मधुरा पार्क, सेजल क्लासिक, अनमोल व्हॅली, प्रियंका पार्क या भागात पाहणी केली. चेंबर मोकळे करण्याचे व दुरुस्त करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. पावसाळ्यात त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले. उर्वरित अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, असे उपअभियंता काझी यांनी सांगितले. याबाबत शहर अभियंता संजय घुगे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.*
यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, चारुशिला गायकवाड (देशमुख), रेखाताई भालेराव, रवींद्र सोनजे, श्रीकांत नाईक, प्रभाकर खैरनार, मनोज पाटील, संजय टकले, बाळासाहेब दुसाने, मगन तलवार, मकरंद पुरेकर, संदीप महाजन, विनोद पोळ, आशिष खानापूरकर, सचिन भोये, डॉ. राजाराम चोपडे, नीलिमा चौधरी, कल्पना सूर्यवंशी, सुरेखा बोंडे, साधना कुवर, कांचन महाजन, प्रमोद महाजन, मोहन पाटील, विनायक गिते, योगेश सपकाळे, संतोष कामनकर, डी. एस. पवार, शेखर राणे हे हजर होते.