नाशिक – शहरातील पंचवटीच्या भागात गोदाघाटानजीक स्मशानबाजूच्या रस्त्याला लागून असलेल्या बाभळीच्या झाडाला काळी बाहुली, लिंबू, कोहळा, नारळ,उडीद ,बिबा, कागदावर लिहिलेल्या मजकुराससह व्यक्तीचा फोटो अशा अंधश्रद्धा युक्त वस्तू खिळ्याने ठोकल्याचे महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांना समजले. अमावस्या, पौर्णिमा अशा दिवशी हे प्रकार तेथे घडतात असे ही कळाले. रहदारीच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडाच्या जाडजूड बुंध्याला दाटीवाटीने ठोकलेला या वस्तू जाणाऱ्या- येणाऱ्याच्या नजरेला सहज दिसत होत्या. त्यामुळे लोकांमध्ये भीती बरोबरच अंधश्रद्धांचा फैलाव होण्याचे ते कारण ठरत होते. म्हणून कार्यकर्त्यांनी पंचवटी पोलिस प्रशासनाच्या मदतीने आणि प्रत्यक्ष सहभागाने आज या खोडावर ठोकलेल्या वस्तू पकडीच्या सहाय्याने उपटून काढल्या. त्यातील अंधश्रद्धा युक्त वस्तू व कागदावर लिहिलेला, घरगुती इच्छा, अपेक्षांसहित, संतापजनक मजकूर लोकांपुढे उघड केला.
हे तोडगे करण्यासाठी स्मशाना शेजारच्याच बाभळीच्या झाडाला निवडणे, मजकूर लिहिलेली पाने एकाच वहीची असणे आणि मजकूर जरी भिन्न असला तरी एकाच अक्षरात लिहिलेला असल्याचे दिसले. ज्यांच्यावर करणी, बाधा झाली किंवा दुश्मन व्यक्तीला त्रास व्हावा, त्या व्यक्तीचा पासपोर्ट आकाराचा फोटोही इतर वस्तू सोबत खिळ्याने ठोकलेला होता. बहुतेक मजकूर हा प्रादेशिक भाषेत तसेच उर्दूमध्येही होता. म्हणजे करणी, भानामती, भूतबाधा जादुटोणा अशा अंधश्रद्धेच्या बाबीं ह्या सर्व धर्मात कमी, अधिक प्रमाणात आहेत, असे स्पष्ट होत होते .
करणी, भानामती, जादूटोणा दूर करण्यास लोकांना प्रवृत्त करणारी व्यक्ती याच परिसरातली असावी, असा अंदाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कारण एकाच वहीच्या पानांवर, एकाच अक्षरांतला मजकूर असल्याचे आढळून आले होते. म्हणून पोलिसांनी अशा या भोंदूला शोधून, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये त्याच्यावर कारवाई करावी, यासह शहर आणि परिसरात पर्यावरणाचे विद्रूपीकरण करणारे, लोकांमध्ये भीती व अंधश्रद्धा पसरवणारे असे प्रकार महानगर पालिकेने तशा आशयाचा फलक तिथे लावून तत्काळ दूर करावेत, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली. लोकांनी अशा अंधश्रद्धा युक्त बाबींना बळी पडू नये,घाबरून जाऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या मोहिमेत डाॅ. टी आर गोराणे, सुदेश घोडेराव,कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, महेंद्र दातरंगे यांनी भाग घेतला.