नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या उड्डाणपुलाच्या खालच्या भागात अनधिकृत विक्रेते तसेच अनधिकृत पार्किंगमुळे उड्डाणपुलाखाली विद्रुपीकरण होत आहे. तसेच रस्ता खराब झाल्याने अनेक अपघात देखील होत आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिका, नॅशनल हायवे विभाग आणि पोलीस विभागाने एकत्रित रित्या काम करून हे अतिक्रमण हटविण्यात यावे, रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरणाची कामे तातडीने करण्यात यावी अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
आज नाशिक येथील कार्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्या प्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी नॅशनल हायवे विभागाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मनपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त नितीन नेर, सहायक सुरेंद्र वाघ यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहरातील उड्डाणपुलाखाली मुंबई नाका ते आडगाव नाका परिसरात अनधिकृत विक्रेते व वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणी विक्रेत्यांकडून कचरा तिथेच टाकला जात आहे तसेच त्या ठिकाणी केलेल्या सुशोभीकरणाच्या कामाचे नुकसान होत असून परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण तातडीने दूर करावे अशा सूचना त्यांनी केल्या.
त्याचबरोबर उड्डाणपुलाखाली असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच मुंबई नाका तसेच द्वारका सर्कलला वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच अभ्यासगट नेमून या दोन्ही सर्कलची रुंदी कमी करण्यात यावी यासाठी नाशिक महानगरपालिका, नॅशनल हायवे विभाग व पोलीस प्रशासनाने समन्वयातून काम करावे अशा सूचना त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
nashik city mumbai naka dwarka traffic jam solution minister chhagan bhujbal ncp