नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. वडाळा-पाथर्डी मार्गावरील कैलासनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. पाचव्या मजल्यावरून फेकून दिलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
विद्या हनुमान काळे (१६) असे मृत मुलीचे नााव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. तर, दुसऱ्याचा पोलिस शोध घेत आहे. विनायक सुरेश जाधव (१८ रा.घोटी ता.इगतपुरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी हनुमंत शाहुराव काळे (४० रा. आदित्य हॉल जवळ, कैलासनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुळचे परभणी येथील काळे कुटुंबिय गुरू गोविंद सिंग कॉलेज समोरील एका बांधकाम साईटवर मोलमजूरीचे काम करतात. बुधवारी सायंकाळच्या सुमारास काळे दांम्पत्य भाजीपाला खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
उपचारादरम्यान मृत्यू
घरात एकट्या असलेल्या विद्याला अज्ञात दोघा तरूणांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर घेवून जात तिला अज्ञात कारणातून जमिनीवर ढकलून दिले. काळे दाम्पत्य रात्री आठच्या सुमारास आपल्या घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मुलीस लेखानगर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. गुरूवारी दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मुलीस वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. या प्रकरणाच अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोण्डे करीत आहेत.
(बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे)