नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गावात आज पहाटे एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंज-यात जेरबंद झाला. या भागात तीन बिबटे दिसले होते. त्यातील एक बिबट्या २५ मार्च रोजी जेरबंद झाला तर दुसरा आज झाला. अजूनही एका बिबट्याचा शोध घेतला जात आहे. शिंदे व जाखोरी येथे या बिबट्यामुळे चांगलीच दहशत पसरली होती. शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे या बिबटयाला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला व त्यात बिबट्या अडकला.
दहा दिवसांपूर्वी शिंदे गावातील बबन महादेव जाधव यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटे या पिंजर्यात बिबट्या अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच पोलीस पाटील रविंद्र जाधव यांनी त्वरीत वनविभागाला माहिती दिली. बिबट्याला पकडल्यामुळे शेतकर्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जाखोरी व शिंदे गावात बिबटे पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे, अनिल आहेरराव व गोविंद पंढरे आदींसह कर्मचारी प्रयत्नशील होते.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648571713893052421?s=20
Nashik City Leopard Trap 2 Out of 3 in Shinde Village