नाशिक – कामटवाडे येथील विठ्ठल नगर मधील हनुमान मंदिराच्या परिसरात शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुर्मिळ जातीचा मांडूळ हा सर्प आढळला. या परिसरातील नागरिकांना हा सर्प दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ दिलीप बडवर यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेला याबद्दलमाहिती दिली. वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष जयेश पाटील आणि सदस्य हेमंत कोलते हे त्वरित पोहचले. त्यानंतर त्यांनी सुरक्षितरित्या सर्पाला पकडून वनविभागाकडे रीतसर सुपूर्त केले. हा सर्प साधारण चार फूट लांबीचा संपूर्ण वाढ झालेला मांडूळ सर्प आहे.
वन्यजीव संरक्षण संस्थेने या सर्पाची माहिती देतांना सांगित की, मांडूळ हा सर्प दुतोंडी साप म्हणून ओळखला जातो. गुप्त धन शोधणे, औषधी गुणधर्म अश्या अनेक अंधश्रद्धांना बळी पडलेला या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होऊ लागली. त्याचमुळे हा सर्प दुर्मिळ घोषित करण्यात आला. शांत स्वभाव असल्यामुळे या सापाबाबत अंधश्रद्धा आणि तस्करीचे प्रमाण जास्त झाले होते. खर तर या सापाला इतर सपांसारखे एकच बाजूने डोकं असते आणि शेपटीचा भाग फक्त डोक्यासारखा दिसतो, त्याच कारण असं त्याच्या नैसर्गिक शिक-याने त्यावर हल्ला केला तर तोंडाचा बचाव होऊन शिकारी शेपटी वर हल्ला होतो आणि त्याचे प्राण वाचतात. परंतु वनविभाग आणि पोलीस प्रशासनामुळे तस्करी बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. तरी असा सर्प कोठे दिसून आल्यास कोणतीही अंधश्रध्देच्या न बाळगता वनविभाग, पोलीस प्रशासन यांना कळवावे. कोणताही सर्प, वन्यप्राणी मारणे त्यांना बाळगणे हा दखलपात्र गुन्हा आहे सर्व वन्यजीव हे १९७२ च्या वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित केले गेले आहे. त्यांना सुद्धा जगण्याचा तितकाच अधिकार जितका आपल्याला, म्हणूनच जागरूक नागरिक बनुया आणि वन्यजीवांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करूया , असे आवाहन त्यांनी केले.