नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद रस्त्यावरील कुमावत नगरातल्या भाबड व्हिलाशेजारी असलेल्या गोडाउनमध्ये छापा मारुन साडेसात लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. या घटनते तीन संशयितांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. शहर पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. २९) मध्यरात्री सुगंधित पानमसाला व तंबाखू असलेल्या गोडाउनमध्ये छापा मारला.
याप्रकरणी रवींद्र जगन्नाथ ब्राह्मणकर उर्फ रवी (वय ४२, रा. मोरया अपार्टमेंट, मखमलाबादरोड) या साठेबाजासह वाहतूक करणारे विकास वाल्मिन भास्कर (३३, रा. मधुबन कॉलनी) आणि सचिन रमेश कोठावदे (३८, रा. पेठरोड) या संशयितांना अटक करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागात संशयित ब्राह्मणकर हा मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाचे वरिष्ठ निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी सापळा रचण्याचे आदेश दिले.
त्यान्वये, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार देवकिसन गायक, संजय ताजणे, गणेश भामरे, बळवंत कोल्हे, नितीन भालेराव, रवींद्र दिघे, अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांद्रे, चंद्रकांत बागडे, योगेश सानप, गणेश वडजे, अविनाश फुलपगारे आणि महिला अंमलदार अर्चना भड यांनी रात्री परिसरात तळ ठोकत कारवाई केली. तिघांवर पंचवटी पोलिसांत अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.