नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गुटख्याची तस्करी करणारा मुख्य माफियाला नाशिक ग्रामीण पोलिसांनी राजस्थानामधील जयपूर शहरात तळ ठोकून अटक केली आहे. कंटेनरच्या माध्यमातून प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी तो देशातील अनेक राज्यात करत असल्याचे समोर आले आहे. राजीव किशनकुमार भाटीया (३८) असे अटक करण्यात आलेल्या संशयित गुटखा माफियाचे नाव आहे.
पोलिसांनी गेल्या २६ मे रोजी केलेल्या कारवाईत सलमान आमिन खान व इरफान आमीन खान या दोघा भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यावेळी तपासात संशयित भाटीया आपले अस्तित्व लपवून गेल्या काही वर्षांपासून देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची तस्करी करीत असल्याचे समोर आले होते. अधिक्षक शहाजी उमाप व अप्पर अधिक्षक माधुरी केदार – कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा कामाला लागली होती. निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करून दिल्ली व राज्यस्थान येथे रवाना करण्यात आले होती.
पथकास मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी जयपूर गाठून ही कारवाई केली. जयपूर शहरात तळ ठोकून पथकाने विधायकपुरी भागातील संशयिताच्या कार्यालयावर पाळत ठेवून त्यास बेड्या ठोकल्या असून त्यास इगतपूरी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यास बुधवार (दि.२८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास निरीक्षक राजू सुर्वे करीत आहेत. ही कामगिरी उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे,हवालदार नवनाथ सानप पोलिस नाईक विश्वनाथ काकड आदींच्या पथकाने केली असून या पथकास अधिक्षक उमाप यांनी दहा हजाराचे बक्षीस जाहिर केले आहे.