नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी नदी पात्रात वकीलाने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रसन्ना भगीरथ पाटील (वय ४२, रा. नाशिक) असे मृत वकीलाचे नाव आहे. पाटील यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर वकिल एका खासगी बँकेत विधी सल्लागार पदावर कार्यरत असल्याचे कळते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी एक वाजता हा प्रकार उघड झाला. नाशिक शहरातील खासगी बँकेत कार्यरत आणि वकीलांमध्ये कर्तव्यतत्पर म्हणून परिचित असलेले प्रसन्ना पाटील हे गुरुवारपासून बेपत्ता होते. यासंदर्भात पोलिसांत माहिती देण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी गंगापूर पोलिसांच्या हद्दीत गोदावरी नदी पात्रात त्यांच्या मृतदेह आढळला.
जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. कामाच्या ठिकाणचा तणाव किंवा कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूनुसार पुढील तपास सुरू केला आहे. त्यांच्या निधनामुळे वकीलांसह आप्तेष्टांनी शोक व्यक्त केला आहे.