नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून भामट्याने महिलेस तब्बल ९ लाखाला गंडा घातला. पाईपलाईन रोड भागात ही घटना घडला. याप्रकरणी मंजिरी सतिश पाटणकर (५४ रा. पूर्णादैवत, गुलमोहर विहार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूक प्रकरणी समजलेली माहिती अशी की, १५ मे रोजी दुपारच्या सुमारास पाटणकर आपल्या घरात होत्या. त्याचवेळी त्यांना ९६१०६२५९७ या क्रमांकावरून कॉल आला. कुरीयर कंपनीतून बोलत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. विदेशातून पार्सल आल्याचे भासवून आणि कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्यांना काही रक्कम ऑनलाईन भरण्यास भाग पाडण्यात आली. आणि ही फसवणूक केली. या भामट्यांनी वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या बँक खातेधारकांच्या खात्यात पैसे भरण्यास लावून तब्बल ९ लाख १ हजार ९५० रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
धारदार शस्त्र बाळगणाऱ्यास कारावास
जिल्हा व सत्र न्यायालयाने घरात धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास एक वर्ष साधा कारावास आणि बारा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गणेश बाळासाहेब चांगले (२८ रा. फ्लॅट नं.१२, श्रीरंग अपार्टमेंट, हनुमानवाडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २०१३ मध्ये समोर आली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र.७ च्या न्या. प्रतिभा पाटील यांच्या समोर चालला. सरकारी वकिल अॅड एस. एस. चितळकर यांनी सरकारतर्फे बाजून मांडली. या गुन्हयाचा तपास हवालदार एस.वाय.पाठक यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस एक वर्षांचा कारावास आणि बारा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
छाप्यात मिळाले होते हे हत्यार
२ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. गणेश चांगले याच्या घरात जीवघेणे शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक एस. डी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला असता चांगले याच्या घरात धारदार तलवार आणि लोखंडी कुकरी अशी हत्यार मिळून आली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) आणि १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Nashik City Cyber Crime Women Cheating Phone Call
Courier Fake Call