नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिलेच्या बँक खात्यातून १८ लाख रुपये इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँकाच्या २१ खात्यांमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करून एकाने गंडा घातला आहे. बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवित ही चोरी करण्यात आली आहे. ही बाब निदर्शनास येताच महिलेने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनम हितेश कुकडे (रा. खुटवडनगर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. कुकडे यांच्याशी गेल्या ३ मार्च रोजी संपर्क साधण्यात आला होता. ९७४५५८४६७६८ आणि ९९२३५४७६२३ या मोबाईलधारकांनी बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळविली.
त्यानंतर २७ मार्च दरम्यान त्यांच्या बँक खात्यातील सुमारे १८ लाख १८ हजार ३५४ रूपयांची रक्कम परस्पर ऑनलाईन पध्दतीने येस, अॅक्सीस, एचडीएफसी, ये.यू.स्माल फायनान्स, आयसीआयसीआय, आयडीएफबी आदी वेगवेगळया २१ बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. ही बाब निदर्शनास येताच कुकडे यांनी पोलिसात धाव घेतली असून दोघा मोबाईलधारकांसह रक्कम वर्ग झालेल्या खातेधारकांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मगर करीत आहेत.