नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल हरविल्यानंतर थोड्याच वेळात बँक खात्यातील तब्बल २१ लाख रुपये लंपास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलमधील बँक अॅपच्या माध्यमातून भामट्यांनी हा सर्व उद्योग केला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बँक खात्यातील २१ लाख ६९ हजार रूपये ऑनलाईन वर्ग केल्याची घटना समोर आली आहे. हरविलेल्या मोबाईलच्या माध्यमातून ही चोरी करण्यात आली आहे. येस बँकेच्या वेगवेगळया खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली असून, याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुकास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मखमलाबादरोड भागातील आकाश किर्तीकुमार शहा (रा. क्रांतीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शहा २६ मार्च रोजी रात्री नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी गोदापार्क भागात गेले होते. शतपावली करीत असतांना या भागात त्यांचा मोबाईल गहाळ झाला. शोधाशोध करूनही मोबाईल न मिळाल्याने शहा घरी परतले होते. कालांतराने या हरविलेल्या मोबाईलच्या माध्यमातून भामट्यांनी बँक खात्याची माहिती मिळवित त्यांच्या खात्यातील २१ लाख ६९ हजाराच्या रकमेवर डल्ला मारला.
बँकेच्या अॅपमध्ये खोडसाळपणा करून संबधितांनी नवीन पासवर्ड तयार करून ही रक्कम परस्पर येस बँकच्या वेगवेगळ्या चार खातेदारांच्या अकाऊंटला वर्ग केली आहे. शहा नेहमीप्रमाणे पासबुक भरण्यासाठी बँकेत गेले असता ही घटना समोर आली. भामट्यांनी हरविलेल्या मोबाईलच्या माध्यमातून रोकड परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेतल्याचे वास्तव चौकशीत पुढे आले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे करीत आहेत.