नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होत नसून पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच आज रात्री ८ वाजेच्या सुमारास एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. पुणे महामार्गावरील बोधले नगर येथे हा प्रकार घडला आहे.
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन पाठलाग करुन ३ जणांनी एका तरुणावर चॅापरने वार केले. त्यात हा तरुण जागीच ठार झाला आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना शनिवारी रात्री ८ वाजता घडली. तुषार एकनाथ चावरे (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पूर्व वैमनस्यातून ओळखीतील व्यक्तींनीच तुषारची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तुषार हा एका दुकानात कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. तो आणि त्याचा मित्र दुचाकीवरुन जात होते. त्याचवेळी ट्रीपलसीट आलेल्या तीन जणांनी त्याच्यावर हल्ला केला. अगोदर या हल्लेखोरांनी तुषारच्या दुचाकीला लाथ मारली. त्यानंतर हा हल्ला केला. यावेळी तुषारच्या मित्राने तेथून पळ काढला. त्यामुळे तो वाचला.
भर रस्त्यावर हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून त्यात हा भर रस्त्यावर हल्ला करण्यात आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा प्रकार कळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.