नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद – म्हसरूळ लिंकरोड भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत दोन युवक जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्नासह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू धात्रक,सागर येलमामे,रोहित पगारे व पप्पू रणमाळे अशी संशयित हल्लेखोर टोळक्यातील सदस्यांची नावे आहेत. याप्रकरणी सौरभ विठ्ठल कदम (२० रा.आदर्शनगर,पेठरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. कदम व त्याचे मित्र सुरज चारोस्कर आणि दत्तू शेलार हे तिघे रविवारी (दि.२५) मखमलाबाद म्हसरूळ लिंकरोडवरील चाणक्य सोसायटी भागात असतांना टोळक्याने त्यांना गाठले.
यावेळी संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत तिघांवर हल्ला चढविला. या घटनेत तिघांना बेदम मारहाण करीत टोळक्याने चारोस्कर व शेलार यांच्यावर धारदारशस्त्राने वार केल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.