नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोड भागात स्कुटी निट चालविण्याचा सल्ला दिल्याने ट्रिपलसिट युवकांनी बुलेटस्वार विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत विद्यार्थी जखमी झाला आहे. याप्रकरणी शारोन राजेश कसबे (२२ रा. माऊली लॉन्स जवळ, कामटवाडे) या युवकाने तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कसबे बुधवारी (दि.७) दुपारच्या सुमारास औरंगाबाद नाका येथील ब्रम्हा व्हॅली कॉलेज मध्ये परिक्षेसाठी जात असताना ही घटना घडली. बुलेटने तो गंगापूररोड मार्गे प्रवास करीत असतांना प्रमोद महाजन गार्डन भागात पाठीमागून भरधाव आलेल्या स्कुटीवरील चालकाने बुलेटला कट मारला.
यावेळी कसबे यांनी गाडी निट चालव असा सल्ला दिला असता अज्ञात ट्रिपलसिट स्कुटी स्वारांनी त्यास शिवीगाळ करीत बुलेट थांबविण्यास भाग पाडले. यावेळी संतप्त त्रिकुटाने त्यास बेदम मारहाण केली. या घटनेत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने कसबे याच्या नाकास आणि उजव्या हातास दुखापत झाली असून अधिक तपास पोलिस नाईक शेवरे करीत आहेत.