नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड लिंकरोडवरील केवलपार्क भागात जुन्या वादाच्या कारणातून टोळक्याने २५ वर्षीय तरूणावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत युवक जखमी झाला आहे. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश महाले, मनोजन महाजन, निखील गवळी, सिध्दार्थ महाले व अज्ञात सहा – सात साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी दर्शन संघपाळ (रा.बंदावणेनगर,कामटवाडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. संघपाळ यांचा भाऊ महेश सुनिल संघपाळ (२५) हा मंगळवारी (दि.११) केवलपार्क भागात गेला असता ही घटना घडली. अंबड लिंकरोडवरील एका टपरीवर थांबलेल्या टोळक्याने त्याची वाट अडवित मागील भांडणाची कुरापत काढून त्यास शिवीगाळ व दमदाटी करीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत टोळक्यातील एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत.