नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवळाली कॅम्प भागात शिवीगाळ करण्याबाबत जाब विचारल्याने एकाने धारदार शस्त्राने ३१ वर्षीय तरूणावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत युवकाच्या गळ्यावर आणि हाताच्या पंजावर वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. पक्या उर्फ प्रकाश उन्हवणे (रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रिहान उर्फ साहिल लियाकत सय्यद (रा. मनोज कटारे चाळ, डेव्हलपमेंट एरिया) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
संशयित उन्हवणे हा सोमवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील गौरव वडापाव सेंटर या दुकानापाठीमागे आरडाओरड करून शिवीगाळ करीत होता. यावेळी जखमी सय्यद यांनी त्यास तू शिवीगाळ का करतोस असे विचारल्याने ही घटना घडली. संतप्त उन्हवणे याने सय्यद यांची पाठफिरताच पाठीमागून धारदार शस्त्राने हल्ला चढविला. अधिक तपास उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.