नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पार्ट टाइम काम मिळवून देण्याचे सांगत दोन घटनांमध्ये ४ लाख ७२ हजार रुपयाची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्टनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घरबसल्या काम, पार्ट टाइम काम असे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला प्रकार आडगाव शिवारात घडला. विनय राजेंद्र पाटील (रा.पंचकृष्णा लॉन्समागे, आडगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नोकरदार असलेले पाटील गेल्या मे महिन्यात फावल्या वेळेसाठी इंटरनेटवर पार्ट टाईम कामाचा शोध घेत असतांना ९९३०९१७८४६ या मोबाईलधारक साधना कुमारी नामक महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला होता. पार्ट टाईम जॉब मिळविण्याची ग्वाही दिल्याने पाटील यांचा विश्वास बसला. संशयित महिलेने विविध कारणे सांगून ही फसवणुक केली. काम देण्याचे आमिष दाखवत संशयित महिलेने वेगवेगळ्या बँक ग्राहकांच्या खात्यावर व टेलीग्रामच्या माध्यमातून त्यांना पैसे भरण्यास भाग पाडले. २७ ते ३१ या अवघ्या पाच दिवसांत पाटील यांनी सुमारे २ लाख ३२ हजार ८६ रूपयांचा भरणा केला असता संशयितांनी संपर्क तोडला. तीन महिने उलटूनही कुठलाही प्रतिसाद न लाभल्याने पाटील यांनी पोलिसात धाव घेतली आहे.
दुस-या घटनेत आबेदेन हकीमुद्दीन सैफिन (३८ रा.तपोवनरोड,द्वारका) हे गेल्या जून महिन्यात इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना ७६५२८६८०८४ या मोबाईल धारकांने त्यांच्याशी संपर्क साधला होता. कामासह त्याच्या मोबदला मिळवून देण्याची संबधीतांकडून ग्वाही मिळाल्याने आबेदेन सैफिन यांचा विश्वास बसला. यानंतर या ना त्या कारणे सांगून त्यांना येस बँक,आयसीआयसीआय,एचडीएफसी बँकेच्या अनोळखी खातेदार आणि युपीआय आयडी व टेलीग्राम चॅनलच्या माध्यमातून पैसे भरण्यास भाग पाडले. २७ ते २९ जून दरम्यान घरबसल्या काम व मोबदला मिळेल या अपेक्षेने तब्बल २ लाख ४० हजार रूपयांची रक्कम संबधीतांना पाठविली असता ही फसवणुक झाली. दोन महिने उलटूनही काम अथवा पैसे परत न मिळाल्याने सैफिन यांनी पोलिसात धाव घेतली आहे.
Nashik City Crime Work From Home Part Time Job Cheating