नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्क फ्रॉम होम करके कमाये हर महिने कमाये इतने पैसे अशा जाहिराती सोशल मीडियावर नेहमी फिरत असतात पण, या जाहिरातीच्या माध्यमातून काही ठिकाणी फसवणूक होत असल्याचे आता पुढे आले आहे. नाशिकच्या एका महिला व तरुणाला या भामट्यांनी तब्बल ६ लाख ७० हजार रूपयांना ऑनलाईन गंडा घातला आहे. यात महिलेला पार्ट टाईम घरबसल्या कामांची ग्वाही देऊन ३ लाख ५१ हजाराची फसवणूक केली तर तरुणाला ३ लाख १८ हजार ९४४ रूपयाला गंडा घातला. या दोन्ही घटनांप्रकरणी फसवणुक आणि आयटीअॅक्ट नुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना दिंडोरीरोड भागात घडली. येथील लोकेश रविकांत दिक्षीत (२५ रा. आकाश पेट्रोलपंपासमोर, गणेशनगर) हा युवक गेल्या मार्च महिन्यात घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना भामट्यांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. १० ते २७ मार्च दरम्यान ८९७४६७१०१० आणि ८१३०२३६७६३ या मोबाईल क्रमांक धारकांनी त्यास वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळय़ा बँक खात्यांवर आणि युपीआय आयडीच्या माध्यमातून ३ लाख १८ हजार ९४४ रूपयांची रोकड भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरूणाने पोलिसात धाव घेतली.
तर दुस-या घटनेत रविना रमेश गोडसे (रा. संसरी लेन नं.२, देवळाली कॅम्प) या महिलेने तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या मे महिन्यात महिला पार्ट टाईम जॉबचा इंटरनेटच्या माध्यमातून शोध घेत असतांना भामट्यांनी तिच्याशी संपर्क साधला होता. घरबसल्या काम मिळवून देण्याची ग्वाही देत भामट्यांनी तिला या ना त्या कारणाचा बहाणा करून वेगवेगळया बँक खात्यात पैसे टाकण्यास भाग पाडले. त्यानंतर मी २ ते ४ मे दरम्यान येस बँक, पंजाब बॅक, एचडीएफसी व वेगवेगळया युपीआय आयडीच्या माध्यमातून सुमारे ३ लाख ५१ रूपये टाकले. मात्र काम मिळाले नाही.
आज उद्या काम मिळेल या अपेक्षेने तीन महिने लोटले गेले तरीही काम अथवा पैसे परत मिळाले नाही. या दोन्ही प्रकरणाच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी फसवणुक आणि आयटीअॅक्ट नुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Work From Home Cheating youth women