नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला चोरट्यांची टोळी शहरात सक्रीय झाल्याचे सध्या चित्र असून प्रवासात अथवा गर्दीच्या ठिकाणी या महिला महिलांच्याच पर्स मधिल दागिणे हातोहात लांबवित आहेत. वेगवेगळ्या भागात घडलेल्या दोन घटनांमध्ये भामट्या महिलांनी पर्स मधील सव्वा लाखाच्या दागिण्यांवर डल्ला मारला. याप्रकरणी पंचवटी आाणि भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरला विजय गांगुर्डे (रा.रामवाडी) ही महिला २९ जून रोजी सायंकाळी डॉमिनोज पिझ्झा अंबड येथून राहते घरी येण्यासाठी रिक्षातून प्रवास करीत असतांना सहप्रवासी असलेल्या दोन भामट्या महिलांनी त्यांचे लक्ष विचलीत करून पर्स मधील सोनसाखळी व ५०० रूपयांची रोकड असा सुमारे ४५ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज हातोहात लांबविला.याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
दुसरी घटना शालिमार भागात घडली. मनिषा नवनाथ भवर (रा.अंबड सातपूर लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भवर या शनिवारी (दि.२) खरेदीसाठी शालिमार भागात गेल्या होत्या. शालिमार चौकात त्या एका हातगाडीवर खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हॅण्ड बॅगची चैन उघडून पाकिट चोरून नेले. या पाकिटात सोन्याचे मंगळसुत्र आणि २ हजार ७०० रूपयांची रोकड असा ८० हजार ७०० रूपयांचा ऐवज होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक शेळके करीत आहेत.
Nashik city Crime Women theft 2 fir booked Women Gang