नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घरासमोर वाहन पार्क करण्याच्या वादातून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला. चार जणांच्या टोळक्याने महिलेसह तिच्या कुटुंबियास शिवीगाळ व मारहाण करीत हे कृत्य केले असून, या हाणामारीत संशयितांनी महिलेच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल कुमावत, राजू कुमावत, दिलीप कुमावत व अमोल कुमावत अशी कुटुंबियास मारहाण करीत महिलेचा विनयभंग करणा-या संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून बुधवारी (दि.७) ही घटना घडली. शेजारी असलेल्या संशयित टोळक्याने येथे गाडी पार्क का केली या कारणातून कुरापत काढून महिलेसह तिच्या कुटुंबियास शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली.
यावेळी संतप्त टोळक्याने विनयभंग करीत महिलेच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. यावेळी हाणामारीत महिलेसह तिच्या कुटूंबियातील चार जण जखमी झाले असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.