नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सितागुंफा भागातील एका लॉजवर महिलेला बोलावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगासह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी झालेली ओळखातून हा प्रकार घडला आहे. या सोशल मीडियाच्या मैत्रीत मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ आणि मॅसेज पाठविण्यात आल्याने महिलेने जाब विचारला असता दोघा संशयितांनी तिचा विनयभंग केला.
अजमाम शेख (रा.कॉलेजरोड) व सोहिल नामक संशयिताने हे कृत्य केले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वीच तिची संशयितांशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. मैत्रीत दोघांनी महिलेचा मोबाईल नंबर मिळविला. एकमेकांमध्ये रोजच चॅटींग होत असल्याने सोमवारी (दि.५) रात्री संशयितांनी वेगवेगळय़ा नंबरवरून चँटींग करीत थेट अश्लिल व्हिडीओ महिलेच्या मोबाईलवर पाठविले.
यामुळे संतप्त झालेल्या महिलेने संशयितांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उद्या बोलू असे म्हणत सकाळी साडे अकरा वाजता सितागुंफा येथील रामा पॅलेस हॉटेल येथे भेटू असा सल्ला दिला. दुस-या दिवशी महिलेने जाब विचारण्यासाठी हॉटेल गाठले असता ही घटना घडली. इजमाम शेख या संशयिताने दमदाटी करीत महिलेकडे शरिर सुखाची मागणी करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास निरीक्षक रणजीत नलावडे करीत आहेत.