नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील राधाकृष्णनगर भागात घरासमोर वाहन पार्क करण्यास विरोध केल्याने एकाने महिलेस शिवीगाळ व मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना घडली. कुणाल भदाणे असे विनयभंग करणा-या वाहनधारकाचे नाव आहे. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयिताविरूध्द विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राधाकृष्ण नगर भागात राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे शेजारी असून, गेल्या सोमवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास संशयिताने महिलेच्या घरासमोर आपले वाहन पार्क केले असता ही घटना घडली.
भदाणे हा महिलेच्या घरासमोर आपले वाहन पार्क करीत असतांना महिलेने त्यास घरासमोर गाडी पार्क करू नको असा सल्ला दिल्याने संतप्त संशयिताने तिला शिवीगाळ व दमदाटी करीत तिला मारहाण करून विनयभंग केला. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने महिला जखमी झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.