नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात विनयभंगाचे प्रकार वाढले आहेत. कट लागल्याचा जाब विचारल्याने एका रिक्षाचालकाने दुचाकीस्वार महिलेस मारहाण करीत तर एकतर्फी प्रेमातून दोघींचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सरकारवाडा, म्हसरूळ आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. याची प्रचिती रविवारी (दि.१९) एका दुचाकीस्वार महिलेस आली. पिडीता दुपारच्या सुमारास आपल्या अॅक्टीव्हावर प्रवास करीत असतांना हा प्रकार घडला. रविवार कारंजा भागातील सानप बंधू व कोंडाजी चिवडा या दुकानासमोरून महिला आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असताना अशोक स्तंभाकडून रेडक्रॉसच्या दिशेने भरधाव येणाºया एमएच १५ ईएच ०२३७ या रिक्षाने दुचाकीस कट मारल्याने हा वाद झाला.
पिडीतेने दादा पुढे बघून रिक्षा चालव असा सल्ला दिल्याने संतप्त रिक्षाचालकाने आरडाओरड करीत महिलेस अश्लिल शिवीगाळ केली. यावेळी महिलेनेही दुचाकी पार्क करून त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने अंगावर धावून जात थांब तुला दाखवतो असे म्हणत महिलेचा विनयभंग करीत तिला मारहाण केली.
हा प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रिक्षाचालक रमेश बाबुराव बोबडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नाईक करीत आहेत. विनयभंगाचा दुसरा प्रकार दिंडोरीरोड भागात घडला. रिलायन्स पेट्रोलपंप परिसरात राहणाºया पिडीतेने याबाबत फिर्याद दिली आहे.
शनिवारी (दि.१८) रात्री पिडाती घर परिसरातील किराणा दुकानात गेली असता ही घटना घडली. गौरव रमेश राऊत (२१ रा. मेघराज बेकरीजवळ इद्रप्रस्थनगर पेठरोड) या संशयिताने पिडीतेची वाट अडवून माझा फोन का उचलत नाही असा जाब विचारला. यावेळी एकतर्फी प्रेमातून विनयभंग करीत त्याने जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक मयुरी तुरे करीत आहेत.
तिसरी घटना एकलहरा भागात घडली. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती एकलहरा येथील मातोश्री इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षण घेते. शुभम तुकाराम एखंडे हा परिचीत तरूण तिला गेल्या १ आॅगष्ट २०२४ पासून त्रास देत असून वेळोवेळी वाट अडवित एकतर्फी प्रेमातून शरिर सुखाची मागणी करीत आहेत. जून. २०२५ मध्ये पिडीता कॉलेजमध्ये गेली असता संशयिताने सोशल मिडीयावर बदनामी करण्याची तसेच लग्न होवू न देण्याची धमकी दिली.
एवढ्यावरच न थांबता संशयिताने अॅसिड टाकण्याची आणि कुटूंबियास जीवे ठार मारण्याची धमकी देत तरूणीचा विनयभंग केला. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.
गोदाघाटावर कोयत्याने हल्ला
झोपेत असलेल्या टॅट्यू आर्टीस्टवर दोघांनी विनाकारण कोत्याने हल्ला केल्याचा प्रकार गोदाघाटावरील दुतोंड्या मारूती भागात घडली. या घटनेत आर्टीस्ट जखमी झाला असून त्याने वेळीच प्रसंगावधान राखल्याने तो बालंबाल बचावला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन युवकांविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा पांडे (१९) व त्याचा अल्पवयीन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. याबाबत वैभव अश्रुबा नरवाडे (२६ रा. तारवालानगर, दिंडोरीरोड) या जखमी टॅट्यू आर्टीस्टने फिर्याद दिली आहे. नरवाडे रविवारी (दि.१९) नेहमीप्रमाणे गोदाघाटावर गेला होता.
रात्रीच्या वेळी व्यवसाय आटोपून तो दुतोंड्या मारूती परिसरातील अमृततुल्य चहा दुकानाजवळील ओट्यावर झोपी गेला असता ही घटना घडली. मध्यरात्री दोनच्या सुमारास झोपेत असतांना त्याच्या डोक्यावर विनाकारण संशयितांनी धारदार शस्त्राने वार केला.
अचानक घाव घालण्यात आल्याने नरवाडे कसेबसे उठून उभे राहिले असता हातात कोयते घेवून उभ्या असलेल्या संशयितांनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला. यावेळी नरवाडे यांनी आरडाओरड करीत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.
संशयितांनी त्यांच्या पायावर व हातावर वार करून धुम ठोकली. या घटनेत जखमी नरवाडे यांनी वेळीच प्रतिकार केल्याने तो बालंबाल बचावला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.