नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागा खरेदी व्यवहारात महिलेची २० लाखाची फसवणुक केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाशी व्यवहार करून बंगला दुस-यास विक्री केल्याचा प्रकार या घटनेत समोर आला आहे.
या फसवणूक प्रकरणी तृप्ती प्रफुल्ल दळवी (रा.शेलार मळा,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. अमित दिलीप कुलकर्णी, दिलीप काशिनाथ कुलकर्णी, पल्लवी अमित कुलकर्णी (रा.तिघे पार्वतीबाई नगर,जेलरोड), हेमंत सोनवणे (रा.जेलरोड) आणि दिपक मोरेश्वर जोशी अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांच्या सर्व्हे नं. ४९ मधील स्वामी नावाच्या बंगल्याचा दळवी यांनी २०२० मध्ये व्यवहार केला होता. २० लाखाची रक्कम अदा करण्यात आल्याने संशयितांनी त्याबाबत साठेखत व स्पेशल जनरल मुख्त्यारपत्र नोंदणीकृत करून दिले होते.
या मिळकतीचे खरेदी न देता मात्र कालांतराने संशयितांनी सदरची मिळकत परस्पर दुस-या इसमास नोंदणीकृत साठेखत करून दिले. याबाबत तक्रारदार महिलेने संशयितांना जाब विचारला असता त्यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक मंगेश गोळे करीत आहेत.